लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नाल्यांतून ७५ टक्के गाळ काढल्याचा दावा केला असून हे नालेसफाई कामांबाबत केलेले दावे खोटे आहेत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. या नालेसफाई कामांबाबत आपण असमाधानी आहोत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आयुक्तानी नाल्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच नालेसफाईच्या कामाबाबत मुंबई महापालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

लोकसभेच्या निवडणूकीसाठीचे मतदान संपल्यानंतर आता पावसाळापूर्व कामांची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझधर बांध जंक्शन, साऊथ अॅव्हेन्यू, नाँर्थ अॅव्हेन्यू, एसएनडीटी नाला येथील नालेसफाई कामाची पाहणी केली. अद्याप समाधानकारक कामे झालेली नाहीत, असे मत व्यक्त केले.

आणखी वाचा-मुंबई : भगवती रुग्णालयाचे काम निकृष्ट दर्जाचे, कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी

यावेळी आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहरात मोठे छोटे अरुंद असे नाले दोन हजार किलोमीटर पर्यंतचे आहेत. नालेसफाईसाठी गेल्यावर्षीच्या अनुभवाच्या आधारे अडीशे कोटींच्यावर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते? अडीशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊन २ हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई समाधानकारक नसते, असाही आरोप शेलार यांनी यावेळी केला. ज्या पद्धतीचा कामाचा वेग आहे तो पाहता पावसाळापूर्वी संपूर्ण नालेसफाई होईल हे अशक्यप्राय वाटत आहे. महापालिका आयुक्त आपण नाल्यावर या, नालेसफाईच्या कामाच्या भेटीचे चित्र दिसू द्या, अजूनही वेळ गेलेली नाही. नाल्यांची ७५ टक्के सफाई झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र चाळीस-पंचेचाळीस टक्क्यांच्यावर नालेसफाई झाल्याचे दिसत नाही, असाही आरोप शेलार यांनी केला आहे.

महापालिकेने २ लाख ७३ हजार मॅट्रिक टन गाळ काढल्याचे म्हटले आहे. हा गाळ कुठे टाकला, व्हिडिओ दाखवा? क्षेपणभूमी कुठे आहे? सर्टिफिकेट दाखवा, जिथून गाळ काढला त्या भागातल्या आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेतली का? कंत्राटदारांनी दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडला, अशीही टीका त्यांनी केली.

आणखी वाचा-मुंबई: विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका…

गेल्या २५ वर्षात उद्धवजींनी काम नीट केले असते तर ही परिस्थिती आली नसती. उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्याचे गाळ मोजण्याचे परिमाण होते ते अजब होते. नाला शंभर टक्के साफ करायचा नाही हा नियम उद्धव ठाकरे यांच्या काळात होता. नाल्यातील गाळ मोजण्याची प्रक्रिया किती, त्याचे परिमाण उद्धवजींच्या काळात वेगळे होते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याचे नवीन मापदंड ठरवण्याची आवश्यकता आहे. नालेसफाईचा परिमाण ठरवणारा नवा मापदंड करावा अशीही मागणी शेलार यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal corporations drainage figures are false issue white paper on drainage work ashish shelar demand mumbai print news mrj
Show comments