मुस्तफा डोसाची ओळख दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार अशी सांगितली जाते. प्रत्यक्षात डोसाच्या मनात दाऊद आणि बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य सूत्रधार टायगर मेमन या दोघांबद्दल आकस होता. दाऊद आणि टायगरने मला फसवले. तस्करीचे जाळे वापरून टायगरने परस्पर आरडीएक्स आणि शस्त्रसाठा मुंबईत आणला. बॉम्बस्फोट मालिकेच्या कटात आलेले नाव, भारतात झालेले प्रत्यार्पण यामागे दाऊदचा हात होता. दाऊदला तस्तरीचे जाळे आपल्या कब्जात घ्यायचे होते, असा दावा डोसाने भारतातल्या विविध पोलीस यंत्रणांसमोर केला होता.

ज्या वस्तूवर कर आहे ती वस्तू परदेशातून विशेषत: दुबईतून समुद्रमार्गे आणायची आणि मुंबईसारख्या मोठय़ा बाजारपेठांमध्ये विकायची हे डोसाचे सूत्र होते.  इलेक्ट्रॉनिक वस्तू, रॅडो-रोलेक्ससारख्या घडय़ाळांची तस्करी केल्यानंतर डोसा सोने व चांदीच्या तस्करीत उतरला. त्याचा मोठा भाऊ महोम्मद मुंबईत तर मुस्तफा दुबईतून तस्करी आणि हवाल्याचा व्यवसाय करू लागले. पायधुनीत या दोघांनी एमएम एन्टरप्राझेस नावाची कंपनी सुरू केली. तेव्हा टायगर मेमन महोम्मदचा चालक होता. तर दाऊद आणि त्याचा मोठा भाऊ शाबीर मुसाफिर खान्यातील फेरीवाल्यांकडून, धंदेवाल्यांकडून खंडणी उकळत. त्याच दरम्यान डोसाची या दोघांशी ओळख झाली. डोसाकडे वाहनचालक म्हणून काम करता करता टायगरही तस्करीत उतरला. बॉम्बस्फोट मालिकेनंतर सुमारे चार वर्षांनी अटक केलेल्या सलीम कुत्ता या आरोपीच्या जबाबातून डोसा बंधूंचे नाव पहिल्यांदा समोर आले.

मनीष मार्केट वसवले

इमामवाडय़ात ज्या उर्दू शाळेत शिकत होता त्याच शाळेबाहेर चणे विकून पोट भरण्याची वेळ मुस्तफा डोसावर आली होती. तेव्हा तो तिसरीत होता. १९७८च्या सुमारास मुस्तफा डोसा आणि त्याचा भाऊ महोम्मद  तस्करीत उतरले.  तस्करीसह हवाल्यातही डोसा बंधूंच्या शब्दाला किंमत मिळू लागली. असाच व्यवसाय त्याने सिंगापूर आणि लंडनमध्ये सुरू केला. मुंबईचे मनीष मार्केट त्यानेच वसवले. मुंबादेवी बाजारपेठेत त्याच्या मालकीची अनेक दुकाने आहेत.

तुरुंगातही थाट

मुंबई बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी मुस्तफा डोसा २००३ पासून ऑर्थर रोड तुरुंगात गजांआड होता. मात्र, त्याची ऐशारामी जीवनशैली तुरुंगातही कायम राहिली. तुरुंगातील १४ वर्षांत त्याने कलेले ऐश्वर्यप्रदर्शन चर्चेचा विषय ठरले आहे. शैलीदार कपडय़ांची आवड त्याने तुरुंगातही जपली होती. त्याच्या कुटुंबाने पुरविलेल्या पैशाद्वारे तो तेथील कर्मचाऱ्यांना लाच देत होता, अशी चर्चा आहे. तुरुंगातील कालावधीत रमजानदरम्यान ‘सेहरी’ आणि ‘इफ्तार’द्वारेही त्याचा बडेजाव दिसायचा. तो ३०० हून अधिक कैद्यांना इफ्तार देत असे, असे त्याचे सहकैदी सांगतात. तुरुंगातील कैद्यांमध्ये मुस्तफाचा दबदबा होता. बॉम्बस्फोट खटल्यातील अन्य आरोपी अबू सालेमवर त्याने धारदार चमच्याने हल्ला केला होता. आपल्याला ‘सलाम’ करण्यास सालेमने नकार दिल्याच्या रांगातून मुस्तफाने हा हल्ला केला होता.

खटल्यातील सहभाग

बाबरी मशीद पतानानंतर  दंगलींमध्ये मुस्लीम समाजावरील तथाकथित अत्याचाराचा बदला घेण्यासाठी  दुबईत महोम्मद अहमद डोसाचा धाकटा भाऊ मुस्तफा अहमद उमद डोसा ऊर्फ मुस्तफा मजनू बैठक घेतली होती. त्या वेळी महोम्मद व मुस्तफासह दाऊद इब्राहिम, अनीस, एझाज पठाण, टायगर मेमन उपस्थित होते. या बैठकीत बॉम्बस्फोट मालिकेसाठी आवश्यक असलेला स्फोटक (आरडीएक्स), शस्त्रसाठा व दारूगोळ्याचा साठा मुंबईत पोहोचवण्याची मुख्य जबाबदारी मुस्तफाने अंगावर घेतली. २० मार्च २००३ रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून डोसाला अटक करण्यात आली होती.

याकूब मेमनपेक्षाही गुन्हा गंभीर

त्याचा बॉम्बस्फोटांतील सहभाग लक्षात घेता सीबीआयनेही  त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी मंगळवारीच विशेष ‘टाडा’ न्यायालयाकडे केली होती. डोसा हाच खरे तर कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यानेच पहिल्यांदा स्फोटांचा कट अमलात आणण्याच्या दृष्टीने स्फोटके आणि शस्त्रांचा साठा मुंबईत दाखल केला, स्फोटांसाठी माणसांची निवड केली. कटाच्या बैठकीसाठी काही आरोपींना दुबईला जाण्याची सोय केली. याकूबने जो काही गुन्हा केला आहे, त्याहूनही गंभीर गुन्हा डोसा याने केला आहे आणि त्याला त्याचा काडीमात्र पश्चात्ताप नाही. त्यामुळे याकूबप्रमाणेच त्यालाही फाशीची शिक्षा व्हायला हवी, असा दावा सीबीआयने  केला होता.

गुन्हेगारी वृत्तीला शिक्षा, व्यक्तीला नाही

न्यायालयाने शिक्षेचा निर्णय सुनावण्याआधीच डोसाचा मृत्यू झाला. त्यामुळे बुधवारी  सुनावणीच्या वेळी विशेष ‘टाडा’ न्यायालयाला त्याच्या मृत्यूबाबत कळवण्यात आले. अंतिम निकाल येण्यापूर्वीच  हे धक्कादायक आहे, असे सांगत सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी न्यायालयाला माहिती दिली. तसेच दोषी आरोपींना काय शिक्षा व्हावी याबाबत सुरू असलेल्या युक्तिवादाची सुनावणी सोमवापर्यंत तहकूब करण्याचीही विनंती करण्यात आली. विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी सीबीआयची ही विनंती मान्य केली. त्याच वेळी न्यायालय गुन्हेगारी वृत्तीला शिक्षा देत असते माणसाला नाही, अशी टिपण्णीही न्यायालयाने  केली.