लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेले शिंदे गटाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या अपेक्षांवर पाणी पडणार असल्याचे मानले जाते. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

भाजपने राज्यसभेवर निवडून आलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या सूचना दिल्या आहेत. राणे यांच्या राज्यसभा खासदारकीची मुदत आता संपत असून त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करण्याची सूचना भाजप नेतृत्वाकडून देण्यात आल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. शिवसेना-भाजपच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता आणि सध्या विनायक राऊत (ठाकरे गट) हे खासदार आहेत. शिवसेनेचे सर्व मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी शिंदे गटाची मागणी आहे. पण ते देण्याची भाजपची तयारी नाही.

हेही वाचा >>> शालेय पोषण आहार आता होणार अधिक पोषक; विद्यार्थ्यांना काय मिळणार?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघात किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेची असल्याने ती शिंदे गटाला हवी आहे. सामंत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे पोस्टर्सही मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावले आहेत. कोकणातील लोकसभा आणि विधानसभेचे अनेक मतदारसंघ अनेक वर्षे शिवसेनेकडे असल्याने तेथे भाजपची ताकद तुलनेने कमी आहे. मात्र कोकणात ताकद वाढवून भक्कमपणे पाय रोवण्याचे भाजपने ठरवले आहे. त्या दृष्टीने राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिली जाणार आहे.

उत्तर मुंबईतून पीयूष गोयल

केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते पीयूष गोयल यांना मुंबईतील सर्वांत सुरक्षित उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. भाजप, शिंदे आणि अजित पवार गटात लोकसभा मतदारसंघ वाटपाची बोलणी सुरू आहेत. विद्यामान खासदार ज्या पक्षाचा आहे, त्या पक्षाला ती जागा देण्याचे सर्वसाधारण सूत्र आहे. पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या जागांवर भाजप उमेदवार उभे करण्याची तयारी करीत आहे. त्या दृष्टीनेच रत्नागिरी-सिंधुदुर्गवर भाजपने दावा केला आहे. ज्या पक्षाकडे जिंकण्याची शक्यता अधिक असलेला तगडा उमेदवार आहे, त्याला ती जागा दिली जाईल, याचाही विचार करण्यात येत असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

राहुल शेवाळेंविरोधात अनिल देसाई?

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मध्य मुंबईतील शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात देसाई निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane likely to contest lok sabha poll from ratnagiri sindhudurg lok sabha constituency zws
First published on: 14-02-2024 at 05:32 IST