* आग पीडितांकडे सरकारचे दुर्लक्ष
* दामूनगरवासीयांची व्यथा
आगीत भस्मसात झालेल्या कांदिवलीतील दामूनगरवासीयांचे राख झालेले संसार पुन्हा उभारण्याकरिता दुसऱ्या दिवसापासूनच येथे अन्नपदार्थाबरोबरच ब्लँकेट, कपडे, भांडीकुंडी अशा मदतीचा ओघ सुरू झाला; परंतु सामाजिक कार्याचे शिक्षण देणाऱ्या ‘निर्मला निकेतन’ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणीमुळे या वस्तीत राहणाऱ्या महिलांची वेगळीच मागणी समोर आली आहे. दामूनगरमधील महिलांकरिता सहावारी साडय़ा बऱ्याच आल्या; परंतु महाराष्ट्रातीलच विविध भागांतून खास करून मराठवाडय़ातून येऊन येथे वसलेल्या मराठी कुटुंबांमधील महिलांना गरज आहे ती नऊवारी साडय़ांची! त्यामुळे, निर्मला निकेतनच्या विद्यार्थ्यांनी आता येथील महिलांकरिता नऊवारी साडय़ा जमा करण्यास सुरुवात केली आहे.
दामूनगरवासीयांचे संसार ११ दिवस उलटले तरी उघडय़ावरच आहेत. सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या दामूनगरवासीयांना आधार देण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय संस्था उभ्या तर राहिल्या; परंतु येथील महिलांना नेमके काय हवे याचा विचार फारसा झाला नाही. येथे गेले अनेक दिवस पडून असलेल्या आणि रहिवाशांना नको असलेल्या कपडय़ांचा ढिगारा पाहिला तरी हे सहज लक्षात येते. म्हणून महाविद्यालयाच्या ३५ विद्यार्थ्यांनी लोकांच्या गरजा जाणून घेण्याकरिता तीन दिवस या भागात पाहणी केली.
वाढणाऱ्या थंडीमुळे येथे आता ब्लँकेटची कमतरता भासू लागली आहे. याशिवाय या भागात मराठवाडय़ातून येऊन राहिलेली बरीच कुटुंबे आहेत. या कुटुंबांतील स्त्रिया नऊवारी लुगडी नेसतात; परंतु आलेल्या मदतीत नऊवारी साडय़ांचा समावेश नव्हता. त्यामुळे ३०० ते ४०० नऊवारी साडय़ांची निकड भासत आहे, असे ‘निर्मला निकेतन’ची विद्यार्थिनी जेनी हिने सांगितले.
मदतीपासून ते घरांच्या पंचनाम्यापर्यंतच्या अनेक गोष्टींत ढिसाळपणा सुरू आहे, अशी व्यथा यातून पुढे आली आहे.

उघडय़ावर राहायचे कसे?
पुन्हा घर बांधण्याचा प्रयत्न करीत असताना सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांची अडवणूक केली जात आहे; परंतु त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारकडून कुठलीच मदत मिळताना दिसत नाही. सामाजिक संस्थांकडून येणाऱ्या मदतीचे योग्य नियोजन केले गेले नसल्याने सर्वच पीडितांना मदत मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय मुलांना शाळेतून वह्य़ा पुस्तके मिळाली. मात्र गणवेश नाही. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तर कुठलीच मदत नाही. मदतीतून आलेल्या जुन्या व वापरलेल्या कपडय़ांचा काहीही उपयोग होत नाही अशी व्यथा दामूनगरमधल्या रहिवाशांनी या विद्यार्थ्यांकडे मांडली.