विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठय़ा प्रमाणावर गळती लागली असून, माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री तसेच आमदार अन्य पक्षांचा रस्ता धरला आहे. यातील काही जणांना राष्ट्रवादीच्या वतीने निवडून येण्याची शक्यता वाटत नाही वा काही जणांना पक्षाने पदे नाकारल्याचा राग आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष बबनराव पाचपुते यांचे गेल्या वर्षी मंत्रिपद काढून घेण्यात आले. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. लोकसभेच्या वेळी नगरमध्ये इच्छुक असताना पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. लोकसभेत पाचपुते यांच्या श्रीगोंदा मतदारसंघात भाजपला तब्बल ६० हजारांचे मताधिक्य मिळाले. यामुळे पाचपुते नाराज झाल्याचे सांगण्यात येते. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांना हिंगोली मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारली होती. त्याऐवजी हा मतदारसंघ काँग्रेसचे राजीव सातव यांना सोडण्यात आला होता.
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये सूर्यकांता पाटील यांची वर्णी लागू शकली नाही. राष्ट्रवादीच्या वतीने आमदार म्हणून निवडून येणे त्यांच्यासाठी कठीण आहे. त्यातूनच त्यांनी बाहेरचा रस्ता धरला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे विविध कारणांनी वादग्रस्त ठरले होते.  मतदारसंघात भरीव काम केल्याचा दावा करणाऱ्या कथोरे यांच्या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजपला ४० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यातच ‘सिडको’चे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मिळणारे झुकते माप कथोरे यांना सलत होते. लोकसभेचा कल लक्षात घेता राष्ट्रवादीच्या वतीने निभाव लागणे कथोरे यांनी भीती वाटत होती.
नारायण राणे यांच्या विरोधात लढण्याकरिता सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांना शिवसेनेची आवश्यकता होती. डॉ. विजयकुमार गावित यांना निलंबित करण्यात आले असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचे पडद्याआडून गुळपीठ कायम आहे. भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या मुलीच्या विरोधात प्रचाराला जाण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने टाळले होते.