सध्या संपूर्ण देशाचं लक्ष अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण दिलं जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निमंत्रण दिलं तरी आपण राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार नाही असं म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. याआधी शरद पवार यांनी काहींना वाटतं मंदिर बांधून करोना जाईल अशी टीका केली होती.

“सध्या देशात करोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे. राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही. तसंच राज्यातील काही नेते सध्या अस्वस्थ दिसत आहेत,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. “महाविकास आघाडीचा रिमोट माझ्या हाती नाही. सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार स्थापन केलं आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली. आम्ही सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांचं एकमत झालं,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

“धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घेतच आहे. तसंच निर्णय घेताना ते सर्व सहकाऱ्यांनाही विश्वासात घेतात. त्यांनी एका ठिकाणी बसून काम करण्यात काही वाद नाही. परंतु त्यांनी थोडं फिरायलाही हवं,” असं शरद पवार म्हणाले.