देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : औरंगाबादमध्ये सातत्याने उद्योजकांवर होत असलेले हल्ले गंभीर असून त्यातून महाराष्ट्राबाहेर जाणारे चित्र विपरीत आहे. याबाबत तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी आणि जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

औरंगाबादमध्ये उद्योजकांवर हल्ले होत असण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. भोगले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना ८ ऑगस्ट रोजी १५-२० गुंडांनी मारहाण केली.

या संदर्भातील सीसी चित्रण पोलिसांकडे आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली असून अन्य फरार आहेत. वाळुंज एमआयडीसी परिसरातील श्री गणेश कोटिंग उद्योगावर १० ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला.

कामगारांचे कंत्राट मिळावे, या मागणीसाठी हे गुंडगेले होते. या दोन घटनांनंतर आता अन्यही छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत आहेत. पेट्रोल भरून पेट्रोलचे पैसे न देणे, हॉटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरुस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत.

विशेषत: गेल्या आठ-दहा महिन्यांत अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामध्ये पोलिसांकडून किरकोळ कारवाई होते व न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरणे प्रलंबित राहतात, अनेक वर्षांनी शिक्षा सुनावली जाते. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो व गुंतवणूकदारांच्या मनात वेगळे चित्र उभे राहते.

महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी, यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गुन्हेगारांवर जरब बसेल, अशी कारवाई करण्याची मागणी फडणवीस यांनी केली आहे.