मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेल्या ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्यातील मेट्रोच्या सेवेत सलग तिसऱ्या दिवशी व्यत्यय आला. मागाठणे येथे सोमवारी मेट्रो बंद पडल्याने प्रवासी बराच वेळ मेट्रो गाडीत अडकले. यामुळे प्रवासी संतप्त झाले.
तांत्रिक दोष दूर करण्याआधीच मेट्रो सुरू करण्याची इतकी घाई का होती असा सवाल प्रवासी उपस्थित करीत होते. गुढीपाडव्याला, २ एप्रिल रोजी नव्या मेट्रो मार्गिका सेवेत आल्यानंतर त्या दिवशी रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत मोफत प्रवासी वाहतूक चालवण्यात आली. मोफत प्रवास करायला मिळत असल्याने शनिवारी प्रवाशांची येथे मोठी गर्दी झाली होती. मात्र, रात्री नऊच्या सुमारात तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो गाडी बंद पडली. दुरुस्ती केल्यानंतर सेवा पूर्ववत झाली. हा तांत्रिक आणि फार छोटा बिघाड असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मेट्रो सेवेची जबाबदारी असणाऱ्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन (एमएमएमओसीएल) कडून सांगण्यात आले. मात्र, रविवारी प्रत्यक्ष सेवा सुरू होण्याच्या दिवशी पुन्हा एकदा मेट्रोची सेवा विस्कळीत झाली.
मेट्रो बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत. पण त्याच वेळी अनेकदा गाडीचे दरवाजे उघडत नसल्याच्या, दरवाजे बंद होत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करीत आहेत. शनिवार, रविवारपाठोपाठ सोमवारीही मेट्रो बंद पडली. मागाठणे येथे अचानक मेट्रो बंद पडली आणि प्रवाशांना अर्धा तास अडकून पडावे लागले. दुसरी गाडी आणून त्यात प्रवाशांना हलवून पुढे नेण्यात आले. या प्रकारामुळे प्रवाशी संतप्त झाले होते. एमएमआरडीए वा एमएमएमओसीएल यावर काहीही बोलण्यास तयार नाही. महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडेही याबाबत विचारणा केली. मात्र ते दिवसभर बैठकीत असल्याने त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.