माजी मंत्री गणेश नाईक यांच्या अस्तित्वाच्या लढाईमुळे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी केवळ ४८.३५ टक्के मतदान झाले असून सुशिक्षितांच्या शहरातील मतदानाची ही टक्केवारी चिंताजनक आहे.
पालिका निवडणुकीची मागील तीन आठवडय़ांपासून सुरू असलेली रणधुमाळी बुधवारी मतदानाने शांत झाली. १११ प्रभागांसाठी ७७४ केंद्रांवर ४८.५ टक्के मतदान झाले आहे. आठ लाख १५ हजार मतदारांपैकी ३ लाख ९४ हजार ६१ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची आकडेवारी उमेदवारांना चिंता करायला लावणारी असल्याने अनेक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. कोपरखरणेमध्ये एक राजकीय दखलपात्र गुन्हा, तर कोपरखरणे, तुर्भे, रबाले, वाशी, सीबीडी पोलीस ठाण्यांत सात अदखलपात्र गुन्हय़ांची नोंद झाली आहे.
औरंगाबादमध्ये ६२ टक्के मतदान
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. महापालिकेच्या १११ वॉर्डासाठी बुधवारी मतदान झाले. महिला, वयोवृद्ध व्यक्तींसह मतदारांनी उत्साहात मतदान केले. शहरातील गणेश कॉलनी भागात बनावट मतदानावर आक्षेप घेत झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक झाली. या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बायजीपुरा, सुराणानगर भागात किरकोळ दगडफेक झाली, तर एक गाडीही फोडल्याने नुकसान झाले. मतदानापूर्वी शिवसेनेकडून पैसेवाटप झाल्याचा आरोप एमआयएमने केला, तो खासदार चंद्रकांत खैरे यांनी फेटाळून लावला.