नगरसेवक पदाच्या पहिल्याच टप्प्यात महापौरपदी बढती मिळालेल्या स्नेहल आंबेकर यांचा पहिला दिवस कामाची जबाबदारी समजून घेण्यापेक्षा आपल्या रुबाबाची चिंता वाहण्यातच गेला. नूतनीकरण झालेल्या महापौर दालनाच्या सजावटीच्या सूचना देण्यात त्यांनी रस घेतला. राज्य सरकारच्या सूचनेनंतरही गाडीवर लाल दिवा कायम ठेवण्याचा त्यांचा अट्टहास असल्याचे पहिल्याच दिवशी उघड झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मी देशाचा प्रधान सेवक’ असल्याचे पहिल्याच दिवशी जाहीर केले. त्या नात्याने महापौरपदाचा अर्थ शहराचा प्रमुख ‘सेवक’ होतो. मात्र पहिल्या दिवशी महापौर दालनात दोन तासांसाठी आलेल्या महापौर आंबेकर यांनी नागरिकांच्या प्रश्नाला हात घालण्यापेक्षा कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ओळख व दोन-चार  कागदांवर सह्य़ा करण्यापुरतेच कामकाज मर्यादित ठेवले. गेल्या दोन वर्षांत पालिका सभागृहात फक्त सहा प्रश्न विचारणाऱ्या तसेच शहरासंबधी महत्त्वाचे व आर्थिक निर्णय घेणाऱ्या पालिकेच्या कोणत्याही वैधानिक समितीच्या सदस्यपदी नसलेल्या स्नेहल आंबेकर या पहिल्याच दिवशी विशेष निर्णय घेतील, अशी अपेक्षा नव्हतीच. मात्र महापौरांशी ओळख करून घेण्यासाठी आलेल्यांशी बोलण्याचे सौजन्यही महापौरांनी दाखवले नाही. चार वाजता ‘मातोश्री’वर जाण्याची घाई असलेल्या महापौरांनी निघता निघता दालनातील सजावटीबद्दलही स्वतची मते मांडली. खासगी सचिवांना सूचनाही केल्या. एलआयसीमध्ये डायरेक्ट मार्केटिंगमध्ये काम करताना विपणन व व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या आंबेकर महापौरपदाची पकड ढिली होऊ देणार नाहीत, याची चुणूक पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांना दिसली. महापौरपदाचे अभिनंदनाचे पुष्पगुच्छ स्वीकारण्यासाठी त्यांच्यासोबत असलेले पती – उपशाखाप्रमुख सूर्यकांत आंबेकर हेदेखील कर्मचाऱ्यांना सूचना करत होते.
दरम्यान राज्य शासनाने अधिसूचना करून महापौरांच्या गाडीवर लाल दिव्याऐवजी पिवळा दिवा लावण्यास सांगितले होते. महापौरपदाचे सहा महिनेच शिल्लक असल्याने माजी महापौर सुनिल प्रभू यांनी हा विषय टाळला होता. मात्र नवनिर्वाचित महापौरांनीही लाल दिव्यात बदल न करण्याचे ठरविले आहे. शहराचे महापौरपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी आरक्षित झाल्यावर सेनेच्या तीन नगरसेविकांमध्ये महापौरपदासाठी चुरस होती तेव्हा स्नेहल आंबेकर यांनी तेव्हा पत्रकारांशी आवर्जून संवाद साधला होता. मात्र पहिल्या दिवशी अभिनंदनासाठी त्यांच्या दालनात गेलेल्या पत्रकारांना मात्र ‘आता या’ची भाषा ऐकून घ्यावी लागली. मातोश्रीवर जाण्याची घाई झालेल्या महापौरबाई व त्यांचे पती यांनी काही पत्रकारांना तर दालनात येऊच दिले नाही. आता घाई आहे, उद्या- परवा वेळ नाही, सोमवारी पाहू.. अशी उत्तरे ऐकून सत्तेच्या जादूचा अविष्कार उपस्थितांना पाहायला मिळाला.