म्हाडाने धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था म्हणून विक्रोळीतील कन्नमवार नगराच्या एका टोकाला ४१ इमारती आणि ४५ चाळी बांधल्या. मात्र त्यांतील रहिवाशांच्या फसवणूकीची प्रकरणे पुढे येत आहेत.
गिरगावातील पिंपळवाडी येथील चाळ क्रमांक १० मध्ये राहणारे मिलिंद सहदेव बैकर हे १९७७ मध्ये कुटुंबासमवेत कन्नमवारच्या संक्रमण शिबिरात राहायला आले. २००८ मध्ये जुन्या चाळीच्या जागी नवीन इमारत उभी राहिली. मात्र आपल्या आईच्या खोटय़ा स्वाक्षऱ्या करून ती सदनिका दुसऱ्याला विकली आहे, अशी बैकर यांची तक्रार आहे. बैकर यांच्या आईचे २०१० मध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी तिने मालमत्तेसंबंधीच्या सर्व कागदत्रांवर अंगठा लावला होता. असे असताना घर विक्रीच्या कागदपत्रांवर तिची सही कशी, असा सवाल त्यांनी केला आहे. या संदर्भात आपली फसवणूक झाल्याबद्दलची सर्व कागदपत्रे त्यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना दाखविली, परंतु त्यांची कुणी दाद घ्यायला तयार नाही.
लालबागच्या जस्टीस पॅलेस (आताची कल्पतरू)मधील रहिवाशी संगीता शंकर सावंत या १९७६ पासून संक्रमण शिबिरात राहतात. जुन्या इमारतीत त्यांच्या दोन सदनिका होत्या. मात्र विकासकाने त्यांना नव्या इमारतीमध्ये केवळ एकच सदनिका देऊ केली. त्याबाबत त्यांनी म्हाडा कडे वारंवार तक्रारी केल्या. तर जुन्या इमारतींमधील त्यांची सदनिका तयार आहे, म्हणून त्यांना आता संक्रमण शिबिरात राहणेही अपात्र ठरविण्यात आले आहे.  
कामाठीपुऱ्याच्या तिसऱ्या गल्लीत राहणारे रामचंद्र कामत १९९२ पासून संक्रमण शिबिरात राहतात. रस्ता रूंदीकरणामध्ये त्यांचे घर गेले. त्यांचे वय आता ६९ वर्षे आहे. तुम्हाला घर मिळेल, एवढेच आश्वासन म्हाडाकडून दिले जाते, घर मात्र अजून मिळालेलेच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nexus of mhada and builders misleading residencials
First published on: 21-07-2013 at 05:21 IST