‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये आज निधी चौधरी यांच्याशी गप्पा

मुंबई : भारतीय समाजमनात प्रशासकीय सेवेबद्दलचे आकर्षण अद्यापही कायम आहे. प्रशासकीय सेवा म्हणजे नेमके काय, त्यासाठीची तयारी कशी असते, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात असतात. मात्र, त्याबद्दलची फक्त माहिती नव्हे, तर स्वानुभवातून आलेल्या गोष्टी ऐकण्याची संधी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्या भेटीतून मिळणार आहे. ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या नव्या पर्वात त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपस्थितांना आज मिळणार आहे.

विविध क्षेत्रांत कारकीर्द घडवणाऱ्या ‘ती’चा सन्मान करणाऱ्या, त्यांचा संघर्ष-प्रवास उलगडून दाखवणाऱ्या ‘लोकसत्ता’ आयोजित ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमाचे नवे पर्व आज, सोमवारी यशवंत नाटय़गृहात संध्याकाळी ६ वाजता रंगणार आहे. या पर्वात मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांच्याशी गप्पा मारण्याचा योग जुळून आला आहे. सध्या पालिकेची प्लास्टिकबंदीची मोहीम सुरू आहे. मुंबई महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणत, प्रत्यक्ष ही बंदी कृतीत यावी यासाठी कारवाई सुरू केली आहे. या धोरणात आणि त्याच्या अंमलबजावणीत निधी चौधरी यांचा मोठा वाटा आहे. त्यांना भेटून त्यांच्या प्रशासकीय सेवेपर्यंतच्या वाटचालीचा आणि अधिकारीपदावर आल्यावर येणाऱ्या आव्हानांचा अनुभव ऐकण्याची संधी ‘व्हिवा लाऊंज’मध्ये मिळणार आहे.

निधी चौधरी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी केली. तिथे कामाचा अनुभव घेत असतानाच त्या घरसंसारातही रमल्या आणि त्यानंतर अंमळ उशिरानेच त्यांनी प्रशासकीय सेवा परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एकेक जबाबदारी स्वीकारत आज त्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदी काम पाहतायेत. प्रशासकीय सेवेत येण्याची त्यांची प्रेरणा नेमकी काय होती?  परीक्षेची तयारी-प्रशिक्षण या गोष्टींना त्या कशा सामोऱ्या गेल्या.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर निधी चौधरी यांना ‘व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर भेटायलाच हवे.

निधी चौधरी

’ वेळ : सायंकाळी ६ वाजता

’ कुठे : यशवंत नाटय़गृह, माटुंगा (प.)

’ ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाने प्रवेश

दिला जाईल.