सामनातील व्यंगचित्रावरुन सुरु झालेला वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. या वादात काँग्रेस नेते आणि नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत जिथे दिसतील तिथे त्यांना फटके टाकणार असे धमकी देणारे ट्विटच निलेश राणे यांनी केले आहे.

सध्या राज्यभरात मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन केले जात आहे. या मोर्चासंदर्भात सामनामध्ये एक व्यंगचित्र छापून आले होते. या आक्षेपार्ह व्यंगचित्रावर मराठा समाजातील अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.  काँग्रेस नेते निलेश राणे यांनीदेखील ट्विटरवरुन या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये एका ट्विटमध्ये निलेश राणे व्यंगचित्राविरोधात राजीनामा देणा-या शिवसेनेच्या एका पदाधिका-याचा फोटो शेअर केला आहे. ‘हा स्वाभिमान, हाच खरा वाघ’ अशा ओळीही त्यांनी फोटोसोबत टाकल्या आहेत. त्यानंतर संजय राऊत यांच्याविषयी ट्विट करताना निलेश राणेंनी त्यांना मारहाण करण्याची धमकीच दिली आहे. यापूर्वी नितेश राणे यांनीदेखील संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात टीका केली होती. असीम त्रिवेंदींना व्यंगचित्रावरुन अटक होऊ शकते तर संजय राऊत संपादक असलेल्या सामनात छापून आलेल्या व्यंगचित्रासाठी राऊत यांना अटक व्हायला हवी, चुकीला माफी नाही असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

सामनामधील व्यंगचित्रावरुन सुरु असलेला वाद तिस-या दिवशीही कायम आहे.  सामनातील व्यंगचित्र ही पक्षाची भूमिका नाही असे स्पष्टीकरण सुभाष देसाई यांनी दिले आहे. तर हा वाद मिटला असून वाद पेटवणारे लोक हे महाराष्ट्राचे वैरी आहेत असे सांगत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. व्यंगचित्रावरुन नाराज झालेल्या शिवसेनेतील पदाधिका-यांनीही राजीनामा दिल्याने शिवसेनेच्या अडचणीत भर पडली आहे. सामनाच्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ मंगळवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. निलेश राणेंनी मंगळवारी ट्विटरद्वारे या दगडफेकीचे समर्थन केले होते. मराठ्यांविरोधात आवाज उठवणा-यांना हेच उत्तर दिले पाहिजे असे निलेश राणेंनी म्हटले होते.