रक्तपेढय़ांमध्ये ‘अब’ आणि ‘ब’ रक्ताचा साठा कमी; सणासुदीत रक्तदान शिबिरे घटल्याचा परिणाम

दिवाळीच्या फटाक्यांमुळे भाजलेली एक तीन वर्षांची चिमुरडी शीव रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दाखल आहे. तिच्यासाठी ‘अब’ पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. मात्र, तिचे वडील गेल्या तीन दिवसांपासून विविध रुग्णालये आणि रक्तपेढय़ांच्या चकरा मारत आहे. परंतु, त्यांना आपल्या चिमुकलीसाठी ‘अब’ पॉझिटिव्ह रक्त अजूनही मिळालेले नाही..

मुंबईत गेल्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या रक्ताच्या टंचाईमुळे निर्माण झालेली परिस्थिती सांगणारी ही घटना आहे. सणासुदीच्या काळात रोडावलेली रक्तदान शिबिरे दिवाळीनंतरही योग्य प्रमाणात पार पडू न शकल्याने मुंबईतील बहुतांश रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा साठा खालावत चालला आहे.

शीव, कल्याण, ठाणे, घाटकोपर या भागात आणि केईएम, सायन, जेजे या सरकारी रुग्णालयांतही रक्ताचा तुडवडा आहे. दिवाळीत महाविद्यालये, कंपन्यांना सुटी असल्यामुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नाही. त्यामुळे या १५ ते २० दिवसांत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत नाहीत. मात्र, यंदा दिवाळीनंतरही रक्तदान शिबिरे फारच कमी प्रमाणात आयोजित करण्यात आली. ‘या काळात रक्ताची आवक नसल्यामुळे असलेला साठा लवकर संपतो आणि रक्तपेढय़ांवर अधिक भार येतो. सध्या ‘अब’ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या १५ बाटल्या आणि ब रक्तगटाच्या ४० बाटल्या उपलब्ध आहे. मात्र एरवी हिच संख्या अनुक्रमे ४० ते ८० युनिटपर्यंत पोहोचते,’ असे ‘प्लाझ्मा’ रक्तपेढीचे विश्वस्त शैलेंद्र भागवत यांनी सांगितले.

कल्याण येथील ‘अर्पण’ रक्तपेढीमध्ये ‘अब’ आणि ‘ब’ निगेटिव्ह रक्तगट उपलब्ध नसून या रक्तगटाची मागणी करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. येथे ‘अ’ पॉझिटिव्हच्या ९, ‘अ’ निगेटिव्हच्या २, ‘ब’ पॉझिटिव्हच्या सात रक्ताच्या बाटल्या असल्याचे या रक्तपेढीचे रवी तोरवणे यांनी सांगितले. तर गुरुवारी शिवडी येथील ‘महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा’ कंपनीत केलेल्या रक्तदान शिबिरात २३ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या असून यातील ‘ब’ पॉझिटिव्हचे जमा झालेले चार बाटल्या रक्त गुरुवारीच देण्यात आल्याचे तोरवणे यांनी सांगितले.

मुंबईतील रक्तपेढय़ांचे केंद्र असलेल्या जेजे महानगर रक्तपेढीत सध्या ३०० युनिट रक्त उपलब्ध आहे, मात्र इतर वेळी ही संख्या दोन हजारापर्यंत पोहोचते असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.  दिवाळीनंतर रक्तपेढय़ांमध्ये तुटवडा जाणवू नये यासाठी सामाजिक संस्था, धार्मिक स्थळांवर छोटी शिबिरे आयोजित केली जात आहेत. यामुळे केईएम रक्तपेढीला मदत होत आहे, असे केईएम रक्तपेढीचे समाज विकास अधिकारी रवींद्र इंगोले यांनी सांगितले.

सण-उत्सव आणि मे महिन्याच्या काळात रक्ताचा पुरवठा कमी होतो. रक्तातील दोषामुळे निर्माण होणाऱ्या थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना याचा अधिक फटका बसतो. वेळेवर रक्त न मिळाल्यामुळे या रुग्णांचे हिमोग्लोबीन झपाटय़ाने कमी होते. चाळीस टक्क्यांहून अधिक रुग्ण मुंबईत असल्यामुळे महिन्याला किमान २५ हजार रक्ताच्या बाटल्यांची गरज असते. मात्र आपल्याकडे व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आमच्याकडे रक्ताच्या मागणीचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे रक्तदानासंबंधाचे केंद्र नसल्यामुळे रक्तपेढय़ा स्वत:चा विचार करून रक्त पुरवीत नाहीत.

– विनय शेट्टी, थिंक फाऊंडेशन