मुंबई : फरारी आर्थिक गुन्हेगार विजय मल्या याच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईस हिरवा कंदील दाखवण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट नकार दिला.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने मल्याच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईला परवानगी दिली होती. त्या विरोधात मल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आर्थिक फरारी गुन्हेगार कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयाने मल्याला आर्थिक फरारी गुन्हेगार जाहीर केले आहे.

या निर्णयाला व कायद्याच्या वैधतेला मल्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर निर्णय येईपर्यंत मालमत्ता जप्तीच्या कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी मल्याने केली होती. न्यायमूर्ती अकील कुरेशी आणि न्यायमूर्ती शारूख काथावाला यांच्या खंडपीठाने गुरूवारी मल्या याची ही विनंती फेटाळली. या प्रकरणी त्यांना दिलासा देण्याचे काहीच कारण नाही, असेही न्यायालयाने  नमूद केले.