आजारांचे निदान, उपचार आणि जनजागृतीवर भर

मुंबई : करोनाच्या साथीदरम्यान गेल्या दीड वर्षांत दुर्लक्ष झालेल्या इतर आजारांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आता पालिकेने आराखडा तयार केला असून दिवाळीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

गेल्या वर्षी मार्चपासून करोनाची साथ सुरू झाली आणि पालिकेची सर्व यंत्रणा करोना नियंत्रणाच्या कामी अडकली. पहिली लाट, दुसरी लाट असे करता जवळपास दीड वर्षांहूनही अधिक काळ थैमान घातलेल्या करोनामुळे सर्व आरोग्य व्यवस्था परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या कामी गुंतली. त्यामुळे इतर आजारांवरील उपचार, नियंत्रण, आनुषंगिक योजना याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. आता दुसऱ्या लाटेचा जोर ओसरला असून अनेक निर्बंध शिथिल केले जात आहेत. त्यामुळे दीड वर्षांपासून दुर्लक्ष झालेल्या करोनाव्यतिरिक्त इतर आजारावर लक्ष देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. करोना काळात संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य अशा दोन्ही प्रकारच्या आजाराच्या प्रतिबंधात्मक उपायांचे कार्यक्रम फारसे राबविले गेले नाहीत. परंतु आता दिवाळीनंतर या दोन्ही आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. पालिकेने यासाठी आराखडा तयार केला असून त्यात क्षयरोग, कुष्ठरोग, एचआयव्ही यांसह मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांबाबत विभागांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. या व्यतिरिक्त आजाराचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर निदान करण्यासाठी तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल. विभागातील आरोग्य केंद्रावरच याची जबाबदारी टाकण्यापेक्षा उपनगरीय आणि पालिकेच्या मोठय़ा रुग्णालयांची मदत घेतली जाणार असून येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आजारांचे निदान, तपासण्या आणि उपचार यावर भर दिला जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

 गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. करोना काळातही या आजारांची गंभीर स्थिती समोर आली आहे. त्यामुळे या आजारांचे निदान वेळेत होणे आणि वेळेत उपचार करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये शहरातील प्रत्येक विभागामध्ये या असंर्सगजन्य आजारांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे पालिकेच्या असंसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.