मुंबई : दहिसर ते मालाड असा मोठा भाग असलेल्या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा रेल्वे वाहतूक हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षात पश्चिम उपनगरातील लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. या भागातील लोक रोज कामधंद्यानिमित्त गर्दीने भरलेल्या रेल्वेने प्रवास करून मुंबईत येतात आणि संध्याकाळी पुन्हा तशाच गर्दीतून परत जातात. यावेळी माजी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनाच भाजपने उमेदवारी दिल्यामुळे रेल्वे वाहतुकीच्या समस्यांची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे.

दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली, चारकोप, मालाड अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या या मतदारसंघातील मतदारांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न असेल तर तो वाहतुकीचा. दररोज कामानिमित्त मुंबईत येणाऱ्यांना पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीशिवाय आज तरी पर्याय नाही. रस्ते मार्गाने वाहतुकीसाठी लागणारा वेळ टाळण्याकरीता रोज लाखो लोक उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत प्रवास करतात. गेल्या काही वर्षात रेल्वेने बोरिवली स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक सोयी सुविधा केल्या असल्या तरी मूळ प्रश्न सुटलेले नाहीत. विरारहून येणाऱ्या गाड्यांमध्ये चढणे बोरिवलीवासियांना अशक्य असते. पण बोरिवलीहून सुटणाऱ्या गाड्या अंधेरीपर्यंत धीम्या गतीने धावत असल्यामुळे इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी खूप वेळ लागत असल्यामुळे थेट बोरिवली गाड्यांची मागणी वाढते आहे. मात्र रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक अतिशय भरगच्च असल्यामुळे त्यात नवीन गाड्या सुरू करता येत नाहीत. तर दहिसरकरांचे हाल त्यापेक्षाही वाईट आहेत. दहिसर स्थानक असले तरी सकाळच्या वेळी गाडी पकडण्यासाठी येथील नागरिकांना रिक्षा, बस करून बोरिवली स्थानकातच यावे लागते. तशीच गत संध्याकाळच्यावेळीही असते. त्यामुळे ट्रेनच्या दरवाजाला लटकून प्रवास करावा लागतो. त्यात अपघाताचे प्रमाणही खूप आहे.

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

कांदिवली, मालाड स्थानक परिसरात राहणाऱ्यांनाही विरारच काय पण बोरिवली गाडीत कोणत्याही वेळी चढणे उतरणे मुश्कील होते. वातानुकूलित गाड्यांमुळे हा प्रवास काहीसा सुसह्य झाला असला तरी या गाड्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळेनुसारच प्रवाशांना आपला दिनक्रम ठरवावा लागतो. त्यातही वातानुकूलित गाड्यांच्या मासिक, त्रैमासिक पाशाचे दर खूप जास्त असूनही प्रवाशांना अनेकदा उभ्याने प्रवास करावा लागतो. उच्चभ्रू, करदाते वर्गातील हे प्रवासी असून त्यांना पासाच्या रकमेइतक्या सोयीसुविधा अपेक्षित आहेत. या सोयीसुविधा देण्यात रेल्वे प्रशासन कमी पडते आहे. वातानुकूलित गाड्यांच्या प्रवासाला पश्चिम उपनगरातून मोठा प्रतिसाद असतो. मात्र येथे नवीन गाड्यांची संख्या वाढवण्यात हे प्रशासन अपयशी ठरले आहे.

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

रेल्वे प्रवासी संघटनेच्या सल्लागार समितीचे राजीव सिंघल यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षात रेल्वे प्रशासनाने बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. मात्र काही समस्या या अद्याप सुटलेल्या नाहीत. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी सेपरेट कॉरिडोर देण्याचे काम अद्याप झालेले नाही. सध्या हे काम केवळ गोरेगाव ते वांद्रेपर्यंतच्या भागातच झाले आहे. हे काम झाल्यास गाड्यांची संख्या वाढू शकते. त्यामुळे मेल गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार होत नाही तोपर्यंत हे हाल असेच सुरू राहणार आहेत. तसेच वातानुकूलित गाड्यांच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. वातानुकुलित गाडीचे दरवाजे बंद असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत मिळू शकेल.