सोलापूर : सोलापूर जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपमध्ये इच्छुक भाऊगर्दीतून अखेर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना संधी मिळाली. त्यांनी प्रचाराला तेवढ्याच आक्रमकतेने सुरुवातही केली खरी; परंतु दुसरीकडे उमेदवारी नाकारले गेलेले भाजपचे प्रदेश प्रवक्ते, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे आणि त्यांच्या कन्येचा हिरमोड झाला आहे. प्रा. ढोबळे यांनी समाजमाध्यमावर आपले मूळ राजकीय गुरू राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासोबतचे स्वतःच्या छायाचित्राचा स्टेटस ठेवला आहे. यातून त्यांची नाराजी प्रकर्षाने प्रकट होत आहे.

प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे-साळुंखे यांनी तर, मनासारखा उमेदवार नसेल तर नोटासमोरचे बटन दाबा, मतदानाचा हक्क नक्की बजावा, असे ढोबळे समर्थक म्हणून थेट आवाहन करणारी पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. सोबत स्टेटसवर ढोबळे कुटुंबीयांचे शरद पवार यांच्या सोबतचे छायाचित्र प्रसारित केले आहे. या माध्यमातून ढोबळे पिता-कन्येला भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा थेट नामोल्लेख टाळून त्यांना मते न देण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला असताना भाजप श्रेष्ठींकडून प्रा. ढोबळे व त्यांच्या कन्या कोमल यांच्यावर कोणती कारवाई करणार की त्यांची समजूत काढणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.

हेही वाचा – सांगलीत प्रचारात रंग भरण्यापूर्वीच रुसवे-फुगवे सुरू

हेही वाचा – रायगडात महायुतीतील वाद चव्हाट्यावर, शिंदे गटाच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

मातंग समाजातून आलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांना उमेदीच्या काळात, १९७८-८० साली शरद पवार यांच्या पारखी नजरेने हेरले आणि त्यांना ताकद मिळाली. चारवेळा आमदारकीसह पुढे मंत्रिपद सांभाळताना अधुनमधून वादग्रस्त विधाने करीत प्रसिद्धीच्या झोतात राहणारे प्रा. ढोबळे हे दुसरीकडे शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण सम्राट झाले. मात्र काळाची पावले ओळखून त्यांनी एका रात्रीत निष्ठा बदलली आणि मोठ्या प्रतिक्षेनंतर त्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळाला. अलिकडे पक्षाने त्यांना प्रदेश प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली होती. यंदाच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रा. ढोबळे व त्यांच्या कन्येला खासदारकीचे वेध लागले असता उमेदवारीसाठी खूप प्रयत्न करूनही संधी मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी जुने गुरू शरद पवार यांची आठवण होऊ लागल्याचे त्यांनी समाज माध्यमातून प्रसारित केलेल्या छायाचित्रावरून दिसून येते.