राणीच्या बागेच्या धर्तीवर पालिकेचा निर्णय

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) धर्तीवर जोगेश्वरी येथील मातोश्री मीनाताई ठाकरे ‘शिल्पग्राम’मध्ये प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी आणि तेथील सुरक्षा व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, गर्दी व्यवस्थापनाचा अभाव आदी बाबी लक्षात घेऊन, तसेच रिकामटेकडय़ांचा वावर रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ‘शिल्पग्राम’ला भेट देणाऱ्या पर्यटकांना प्रवेश शुल्काचा भार सोसावा लागणार आहे.

जोगेश्वरी पूर्व येथील पूनम नगरमधील वेरावली जलाशयाजवळ पालिकेने ८.५ एकर जागेमध्ये ‘शिल्पग्राम’ उभारले असून तेथे शिल्पांच्या रूपात १२ बलुतेदारांच्या कला-कौशल्याची, भारतीय नृत्य शैलीची ओळख करून देण्यात आली आहे. अलीकडेच पालिका प्रशासनाने या ‘शिल्पग्राम’चे लोकार्पण केले. ‘शिल्पग्राम’ पाहण्यासाठी गर्दी वाढल्यामुळे तेथील सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पर्यटकांसोबतच काही रिकामटेकडय़ा व्यक्तींचा वावर ‘शिल्पग्राम’मध्ये वाढू लागला आहे. परिणामी, ही वाढती गर्दी पालिकेला डोकेदुखी बनू लागली आहे.

गर्दी व्यवस्थापनावर मात्र म्हणून पालिकेने ‘शिल्पग्राम’मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राणीच्या बागेमध्ये पूर्वी नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येत होते. मात्र राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाल्यानंतर तेथील प्रवेश शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. राणीच्या बागेत हम्बोल्ट पेंग्विन पाहण्यासाठी येणारे आई-वडील आणि दोन मुलांच्या कुटुंबासाठी १०० रुपये, ३ ते १२ वर्षे वयोगटातील मुलासाठी २५ रुपये, १२ वर्षांवरील व्यक्तीसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच पालिका शाळांमधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना राणीच्या बागेत विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. याच धर्तीवर ‘शिल्पग्राम’मधील प्रवेश शुल्क निश्चित करण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

शुल्क निश्चिती लवकरच

राणीच्या बागेप्रमाणेच पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘शिल्पग्राम’मध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही प्रवेश शुल्कात सवलत देण्याचा विचार सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांमध्ये प्रवेश शुल्क निश्चिती करण्यात येणार असून प्रशासन, स्थायी समिती, सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर ‘शिल्पग्राम’मध्ये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात येईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.