अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे परदेश दौरे, त्यांच्या बैठका, राजकीय प्रचार मोहिमा अशा अनेक गोष्टी लोकांनी पाहिलेल्या आहेत. बराक ओबामा यांचा सामाजिक आणि राजकीय वावर दूरचित्रवाणीच्या माध्यमातून अनुभवलेल्या लोकांना ‘डिस्कव्हरी’ वाहिनीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘रनिंग वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स’ या शोच्या माध्यमातून जगभरातील जंगल सफारी घडवणाऱ्या बेअर ग्रिल्सबरोबर अलास्कन प्रदेशाची भ्रमंती करणारे बराक ओबामा नववर्षांच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळणार आहेत.

बेअर ग्रिल्स हा ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवरील सव्‍‌र्हायवल एक्स्पर्ट म्हणून ओळखला जातो. त्याच्या शोजबरोबरच त्याच्या या साहसी मोहिमांची कीर्ती जगभर पसरलेली आहे. याच साहसी मोहिमेच्या नादात मरता मरता वाचलेला बेअर ग्रिल्स पुन्हा एकदा नवीन शोजच्या माध्यमातून सक्रिय झाला आहे. ‘रनिंग वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स अँड प्रेसिडेंट बराक ओबामा’ हा खास भाग ३१ डिसेंबरला ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. या भागात बेअर आणि बराक ओबामा यांनी केलेली अलास्का प्रदेशाची भ्रमंती पाहायला मिळेल. वातावरणात वेगाने जे बदल घडून येत आहेत त्याचा थेट परिणाम अलास्काच्या वन्य प्रदेशावर कशा पद्धतीने होतो आहे, याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिके चे अध्यक्ष बराक ओबामांनी बेअरबरोबर या प्रदेशाची भ्रमंती केली.

या भ्रमंतीदरम्यान केवळ वातावरणातील बदल, अलास्काचे वैविध्यपूर्ण जंगल आणि तिथले वन्यजीवन याबद्दल या दोघांनी गप्पा मारलेल्या नाहीत, तर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यांचे अनुभव, कुटुंबीयांवर असलेले प्रेम या सगळ्याविषयी ओबामांनी फिरता फिरता मारलेल्या गप्पाही ऐकता येणार आहेत. जंगलात राहताना ओबामांनी केलेली पाकसिद्धीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बेअर ग्रिल्स आणि बराक ओबामांसारखी दोन मोठी, प्रभावी व्यक्तिमत्त्वे जेव्हा एका वेगळ्या परिस्थितीत एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात घडणारा संवाद ही फार मोठी पर्वणी आहे. ‘रनिंग वाइल्ड विथ बेअर ग्रिल्स अँड प्रेसिडेंट बराक ओबामा’ या शोच्या निमित्ताने ‘डिस्कव्हरी’ वाहिनीच्या प्रेक्षकांना ओबामांच्या व्यक्तिमत्त्वाची ही वेगळी झलक पाहणे ही मेजवानी ठरणार असल्याचे मत ‘डिस्कव्हरी’ नेटवर्कच्या दक्षिण-पूर्व आशियाई विभागाचे महाव्यवस्थापक राहुल जोहरी यांनी व्यक्त केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.