मुंबई : वीज देयक थकल्याच्या नावाखाली वांद्रे येथील साहाय्यक लेखा अधिकाऱ्याची सुमारे सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने अ‍ॅप्लिकेशनवर प्रक्रिया करण्याच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम काढली.  तक्रारदार  बीकेसी येथील लेखा परीक्षा भवनमध्ये साहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मंगळवारी दुपारी एक संदेश आला होता. त्यात त्यांच्या घराचा वीजपुरवठा बंद होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यात एक मोबाइल क्रमांक होता. या मोबाइलवर दूरध्वनी केल्यानंतर समोरील व्यक्तीने तो महावितरणमधील अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने त्यांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून पुढील प्रक्रियेसाठी त्यांना पाच रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अ‍ॅपवर पाच रुपये पाठविण्याचा प्रयत्न केला असता  त्यांच्या बँक खात्यातून आधी दोन लाख आणि नंतर एक लाख वीस हजार रुपये वळते झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.