मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान १३० मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), ३० मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७९ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, ३३६ किलोमीटर लांबीचे रस्तेही स्वच्छ करण्यात आले.

मुंबई गेल्या २७ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत प्रत्येक शनिवारी पालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात १३० मेट्रिक टन राडारोडा, ३० मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ७९ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. तसेच, सुमारे ३३६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली.

हेही वाचा – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करा, झोपु प्राधिकरणाचे विकासकांना आदेश, मार्गदर्शक सूचना जारी

हेही वाचा – राज्यात उष्माघाताचे रुग्ण २५० पार; जालना, नाशिक, बुलढाणामध्ये सर्वाधिक रुग्ण

एकूण १ हजार ५४३ कामगार – कर्मचाऱ्यांसह जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स यंत्र, मिस्टींग यंत्र आणि अन्य अद्ययावत यंत्रणांच्या साहाय्याने ही कामगिरी करण्यात आली. पी दक्षिण विभागात कृष्णवाटिका मंदिर परिसर, टी विभागात मुलुंड पश्चिम येथील डॉ. आर. आर. मार्ग, आर दक्षिण विभागात कांदिवली (पश्चिम) येथे मिलाफ सिनेमागृह परिसर, स्वामी विवेकानंद मार्ग, एम पूर्व विभागात वामन तुकाराम पाटील मार्ग, के पश्चिम विभागात व्ही. एम. मार्ग, एल विभागात कुर्ला पूर्व येथे हशू आडवाणी चौक, शिवसृष्टी मार्ग, आर उत्तर विभागात दहिसर पूर्व येथे गणपत पाटील नगर, के पूर्व विभागात प्रभाग ७८ मध्ये झोपडपट्टी व तत्सम परिसर, पी उत्तर विभागात टाईम्स ऑफ इंडिया पूल परिसर, एस विभागात टागोर नगर, ए विभागात चर्चगेट येथील विठ्ठल ठाकरसी मार्ग, ज्ञानसम्राट मार्ग, डी विभागात श्रीमद् राजचंद्र मार्ग, गगनगिरी महाराज मठ ते तांबे चौक, एच पूर्व विभागात सांताक्रुज येथे कलिना जंक्शन ते रझाक जंक्शन, एच पश्चिम विभागात खार येथील चित्रकार धुरंदर मार्ग, आर दक्षिण विभागात ठाकूरगाव, समता नगर, एफ उत्तर विभागात प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, जी उत्तर विभागात माहीम कोळीवाडा, रेती बंदर, कॉज वे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत संबंधित परिमंडळांतील उपआयुक्त, सहायक आयुक्त, अधिकारी, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.