लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यामध्ये वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील अडीच महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या २५० पार गेली आहे. सर्वाधिक रुग्णांची नोंद जालना, नाशिक, बुलढाणा आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये झाली आहे.

राज्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये वाढत्या तापमानामुळे उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यातच देशातील उत्तरेकडील राज्यामध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. दिल्लीमध्ये उष्णतेचा पारा ५० अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा त्रास होण्याचे प्रमाण वाढत आहे.

आणखी वाचा-मुंबई : साफसफाई केलेल्या नदी-नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

मार्च, एप्रिल आणि २० मेपर्यंत राज्यभरात उष्माघाताचे तब्बल २५१ रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये एप्रिलच्या अखेरपर्यंत नाशिक व बुलढाण्यामध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र मे महिन्यामध्ये जालना जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जालना व नाशिकमध्ये सर्वाधिक २८ रुग्ण सापडले आहेत. त्याखालोखाल बुलढाणा २२, धुळे २०, सोलापूर १८, परभणी १२ रुग्ण आढळले आहेत. तसेच लातूर, मुंबई आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.

एप्रिलमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले

राज्यात १ मार्चपासून २० मेपर्यंत उष्माघाताचे २५१ रुग्ण आढळले आहेत. यापैकी मार्चमध्ये ४०, एप्रिलमध्ये १६०, तर २० मे पर्यंत ५१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याचे निदर्शनास आले आहे.

जालना – २८
नाशिक – २८
बुलढाणा – २२
धुळे – २०
सोलापूर – १८
परभणी – १२
नागपूर – ११
उस्मानाबाद – १०
सिंधुदुर्ग – १०