मुंबई : करीरोड येथील वन अविघ्न  पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शुक्रवारी लागलेल्या आगीत स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला.   अरुण तिवारी (३०) असे या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करी रोड येथील महादेव पालव मार्गावरील वन अविघ्न  पार्क या ६० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर सकाळी ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आग लागली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलासह सर्व संबंधीत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरूप वाढल्याने इतर ठिकाणांहून देखील अग्निशमन यंत्रणांना बोलावण्यात आले. सुमारे १४ बंब, ९ जम्बो टँकर, १ नियंत्रण कक्ष वाहन, ९० मीटर उंचीची १ आणि ५५ मीटर उंचीची १ अशा २ शिड्या आदी मिळून ४० वाहने घटनास्थळी तैनात होती. या यंत्रणेसह अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रयत्नांची शर्थ करून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविले तर साधारण पाच वाजता आग पूर्णपणे शमली. या दरम्यान अग्निशमन दलाने इमारतीतून १६ नागरिकांची सुखरुप सुटका केली. इमारतीत धूर पसरताच सुरक्षा रक्षकाने गच्चीतून बाहेर येऊन खालच्या मजल्यावरील गच्चीत जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा हात सुटून आणि तो खाली पडला. त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित केले. इमारतीजवळ जाणारी मार्गिका वर्दळीची असल्यामुळे करी रोड व भारत माता चित्रपटगृह दोन्ही बाजूला वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. 

दोषींवर कारवाई : महापौर

 महापौर  किशोरी पेडणकर आणि पालिका आयुक्त  इकबाल सिंग चहल यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. रहिवाशांनी केलेल्या तक्रारीची योग्य दखल घेण्यात आली असून तथ्य आढळल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. आगीच्या घटनेची संपूर्ण प्रशासकीय चौकशी करण्यात येईल संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका आयुक्त  इकबाल सिंग चहल यांनी सांगितले.