मुंबई : अ‍ॅमेझॉनवरून मोबाइल खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची एक लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मलबार हिल परिसरात घडला. मोबाइल फोन घरपोच करण्यात तांत्रिक अडचणी येत असून खरेदीसाठी जमा केलेली रक्कम परत करायची आहे, असे सांगून आरोपीने त्यांचे पैसे परस्पर वळते केले.

ही ज्येष्ठ नागरिक व्यक्ती स्वत:करिता ऑनलाइन मोबाइल मागवत होती. या मोबाइलची मागणी त्यांनी कंपनीकडे नोंदविली होती. तसेच त्याचे पैसेही दिले होते. मागणी नोंदविल्यानंतर काही काळाने या ज्येष्ठ नागरिकाला अ‍ॅमेझॉन कंपनीचा ग्राहक प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगून राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीने फोन केला. तुम्ही मागणी नोंदविलेला मोबाइल फोन घरपोच करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तुम्ही जमा केलेली रक्कम कंपनी परत करणार आहे. त्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती हवी आहे, असे शर्माने या ज्येष्ठ नागरिकाला सांगितले. तसेच मोबाइल फोनमध्ये एक अ‍ॅप्लिकेशन डॉऊनलोड करण्यास सांगितले. या ज्येष्ठ नागरिकाने शर्माच्या सूचनेनुसार माहिती अ‍ॅप्लिकेशनमध्ये भरताच त्यांच्या खात्यावरून एक लाख ५९ हजार रुपये परस्पर वळते झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या ज्येष्ठ नागरिकाने मलबार हिल पोलिसांकडे तक्रार दाखल केली.