आपल्याला एखादी वस्तू खरेदी करायची नसते आणि ती खरेदी करण्याच्या संदर्भातील ई-मेल्स आणि लघुसंदेश आपल्याला येत असतात. हे ई-मेल्स आणि लघुसंदेश आपण अनेकदा न पाहता डिलिटही करतो. मात्र आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई-विपणन व्यवस्थेचा हा एक भाग असून यासाठी कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते. कंपन्यांच्या ई-मेल्सकडे होणारे दुर्लक्ष आणि लोकांना न कळतपण होणारा त्रास टाळण्यासाठी आयआयटीयन्सनी शक्कल लढवली आणि ग्राहकाला अधिक सवलत देणारे व कंपन्यांना कमी गुंतवणुकीत ग्राहकांपर्यंत पोहचवणारे संकेतस्थळ सुरू करण्याचा विचार केला आणि यातूनच http://www.dealwithus.co.in या संकेतस्थळाचा जन्म झाला. साधारणत: दीड वर्षांपूर्वी ही संकल्पना अविनाश कुमार अंशु आणि कमल कुमावत यांना सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली.
गरजेतून व्यवसाय
साधारणत: दीड ते दोन वर्षांपासून देशात ई-शॉपिंगचे प्रमाण खूप वाढले. यामुळे त्या जोडीला त्यांचे विपणनही वाढले. या विपणन व्यवस्थेत कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करावी लागत होती. याचबरोबर ग्राहक या विपणन प्रक्रियेला कंटाळू लागले होते. अनेक ग्राहक या जाहिराती येऊ नये म्हणून ई-मेलमध्ये फिल्टर लावत होते. तर कंपन्यांनाही १०० ई-मेल्स गेल्यावर जेमतेम १० जणांकडूनच प्रतिसाद मिळत होता. या सर्व पाश्र्वभूमीवर कंपन्या आणि ग्राहकांना जोडणाऱ्या एका वेगळय़ा माध्यमाची गरज होती. याचवेळी अविनाश आणि कमल यांना ही संकल्पना सुचली आणि त्यांनी एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ई-शॉपिंग संकेतस्थळे आणि ग्राहकांचा दुवा होण्याचा निर्णय घेतला.
निधीची उभारणी
सुरुवातीच्या काळात दोघांनी स्वत:चे काही पैसे खर्च करून उद्योग उभारणी केली. यानंतर आयआयटीच्या ई-सेलच्या माध्यमातून त्यांनी काही गुंतवणूकदार मिळवले व व्यवसाय अधिक पुढे नेला. सध्या सरकारच्या स्टार्टअपच्या धोरणामुळे निधी उभारणे सोपे होऊ लागले आहे. यापूर्वी पैसे देणारी कंपनी स्टार्टअपना पैसे देण्यास फारशी उत्सुक नसायची. पण आता काळा बदलला असून अनेक बडय़ा कंपन्या गुंतवणुकीसाठी तयार आहेत.
भविष्यातील वाटचाल
भविष्यात अधिकाधिक ग्राहक आणि नवनवीन ब्रँड्स संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस अविनाशने व्यक्त केला. याचबरोबर ग्राहकांच्या समस्यांचे निराकारण करून त्यांना खरेदीचा चांगला अनुभव देण्याचाही मानस असून पुढील महिनाभरात संकेतस्थळावर नवीन उत्पादने उपलब्ध होतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
नव उद्योजकांना कानमंत्र
लोकांची गरज हा आपला व्यवसाय असू शकतो. यामुळे लोकांची गरज ओळखून व्यवसायाची निवड करा. योग्य वेळी योग्य ती गोष्ट उपलब्ध करून देणे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. याचबरोबर जर तुम्हाला काही तरी वेगळे द्यायचे असेल तर तुम्ही फेसबुकसारखी आकर्षक सुविधा दिली पाहिजे. जेणेकरून लोक तुमच्याकडे येतील आणि तुमचा व्यवसाय वृद्धिंगत होऊ शकतो, असा कानमंत्र अविनाशने नवउद्योजकांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे चालते संकेतस्थळ
या संकेतस्थळावरून आपल्याला देशभरातील ४०० हून अधिक कंपन्यांची विविध उत्पादनांची खरेदी करता येऊ शकते. या संकेतस्थळावर एकाच ठिकाणी आपल्याला अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, आस्क मी बाझार, ईबे यांसारख्या ई-शॉपिंग संकेतस्थळांबरोबरच डॉमिनोज, फासोस, येप मीसारख्या वैयक्तिक ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांची ऑफर्ससह माहिती मिळू शकणार आहे. यामध्ये आपल्याला कंपन्यांनी देऊ केलेल्या ऑफर्सचा लाभ मिळतोच. त्याचबरोबर ‘डील विथ अस’ या संकेतस्थळाकडून कॅशबॅकही मिळते. ही कॅशबॅक आपला व्यवहार पूर्ण झाल्यावर अवघ्या दहा मिनिटात मिळते, असा कंपनीचा दावा आहे. आमचा मुख्य ग्राहक हा महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे अविनाशने नमूद केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online shopping portal dealwithus reviews
First published on: 21-04-2016 at 03:27 IST