मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवरशहरातील सर्व पब, ऑर्केस्ट्रा बार, डिस्कोथेक ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी मंगळवारी जारी केले. करोना संसर्ग पसरू नये यासाठी ‘नॅशनल रेस्टॉरेन्ट असोसिएशन ऑफ इंडिया’ने ३१ मार्चपर्यंत हॉटेल, बार बंद ठेवण्याची सूचना मंगळवारी देशभरातील सदस्य आस्थापनांना केली. या सूचनेनुसार असोसिएशनशी संलग्न काही आस्थापनांनी मंगळवारपासून व्यवसाय बंद केला.

‘नॅशनल रेस्टॉरेन्ट असोसिएशन ऑफ इंडियाने’ही देशभरातील सुमारे सहा हजार सदस्य आस्थापनांना ३१ मार्चपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याची सूचना केली. प्रत्येक मोठे हॉटेल किंवा बारमध्ये ६० ते ७० कर्मचारी काम करतात. त्यात ग्राहकांची भर पडते. मुंबईसारख्या शहरात सुमारे पाच लाख हॉटेल कर्मचारी आहेत. व्यवसायापेक्षा सद्यस्थितीत करोना संसर्ग रोखण्यास प्राधान्य असेल, असे अनुराग यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

असोसिएशनचे देशभरात पाच लाखांहून अधिक सभासद आहेत.  शाकाहारी किंवा मांसाहारी आणि बार यात फरक करता येणार नाही. येत्या तीन दिवसांत करोना संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली नाही तर या निर्णयाबाबत पुनर्विचार करून नवी भूमिका घेतली जाईल, असे अनुराग यांनी स्पष्ट केले.

‘फर्स्ट फिडल’ समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांक सुखीजा आणि इम्प्रेसेरीयो समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रियाज अमलानी यांनी असोसिएशनचा निर्णय होण्याआधीच  हॉटेल  ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.