मुंबई : मुंबईमधील लहान-मोठय़ा नाल्यांच्या सफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्रीचा वापर करावा, असे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी गुरुवारी दिले. तसेच नालेसफाई दोन पाळय़ांमध्ये करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नालेसफाईदरम्यान काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी आणि निर्धारित ठिकाणी टाकण्यापूर्वी असे दोन वेळा त्याचे वजन करताना व्हिडीओ चित्रण करावे, अशी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.
मुंबईमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईबाबत भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच सध्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबतचा सचित्र अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवारी आयुक्तांच्या नालेसफाई पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली. मुंबईत सुमारे ३४० कि.मी. लांबीचे छोटे-मोठे नाले असून त्यांची पावसाळय़ापूर्वी सफाई करण्यात येते. दरवर्षी नाल्यांची एका पाळीमध्ये सफाई करण्यात येत होती. मात्र यंदा प्रथमच दोन पाळय़ांमध्ये नालेसफाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. कामात पारदर्शकता यावी यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
नालेसफाईच्या कामात अधिक पारदर्शकता यावी यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. नालेसफाईदरम्यान काढण्यात येणारा गाळ काही दिवस नाल्याकाठीच ठेवण्यात येतो. त्यानंतर तो कचराभूमीत वाहून नेण्यात येतो.
नाल्याकाठी ठेवलेला गाळ आणि कचराभूमीत टाकण्यापूर्वी असे दोन्ही वेळी त्याचे वजन करताना व्हिडीओ चित्रीकरण करावे, असे सक्त आदेश चहल यांनी दिले आहेत. यावेळी अतिरिक्त पालिका आयुक्त पी. वेलरासू, उपायुक्त उल्हास महाले, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मिठी नदीमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आयुक्तांनी दौऱ्याला सुरुवात केली. वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील बीकेसी जोडपुलाजवळच्या कॅनरा बँक कार्यालयासमोरील मिठी नदीत सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. धीरूभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीच्या पात्रात आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे सुरू असलेल्या साफसफाईच्या कामाचा आढावाही त्यांनी घेतला.
वांद्रे पूर्व परिसरातील उत्तर भारतीय संघ भवनाजवळील वाकोला नदी, वांद्रे टर्मिनसजवळील वाशी नाका नाल्याची पाहणी आयुक्तांनी केली. सध्या सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळापूर्व कामे ३१ मेपर्यंत
नालेसफाईची पावसाळापूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. मात्र ही कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवावे, अशी सूचना चहल यांनी संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांना दिली.