‘मेस्मा’ लावण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी
आपल्या विविध मागण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून संपावर असलेल्या निवासी डॉक्टरांवर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा नियमन (मेस्मा) कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी रात्री दिले. त्यामुळे डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांना विनावॉरंट अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच संपकरी डॉक्टरांना बडतर्फ करून सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरांची सेवा पुरवण्याचा इशाराही वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिला.
आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी ‘मार्ड’च्या नेतृत्वाखाली तीन दिवसांपासून संप पुकारला आहे. उच्च न्यायालयानेही संप मागे घेण्याचा डॉक्टरांना आदेश दिला आहे. डॉक्टरांनी संप मागे न घेतल्यास त्यांच्यावर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालायाने दिले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री वैद्यकीय शिक्षण विभागाने संपकरी डॉक्टरांवर ‘मेस्मा’ लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज, शुक्रवारपासून संप करणाऱ्या डॉक्टरांना विनावॉरण्ट अटक करण्यात येणार आहे. या कायद्याअंतर्गत सहा महिने कैद किंवा दोन हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.
दरम्यान, पुढील दोन-तीन दिवसांत जे डॉक्टर कामावर हजर होणार नाहीत, त्यांच्यावर पूर्वपरवानगी न घेता गैरहजर राहिल्याबद्दल व संपात सहभागी झाल्याबद्दल बडतर्फीची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती विजयकुमार गावित यांनी दिली.
पुण्यात माघार
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. तीन दिवस संपावर असणारे ३५० निवासी डॉक्टर्स सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याने ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सेवा पूर्वीसारख्या सुरळीत होणार आहेत.