अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना पुन्हा एकदा आग्रही होताना दिसत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी एएनआयशी बोलतांना याबाबत भूमिका मांडील आहे. त्यांनी सांगितले की, मला वाटते यंदा तरी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या कामाल सुरूवात व्हायला हवी, अन्यथा देश आपल्यावर विश्वास ठेवणे बंद करेल. आता भाजपाचे ३०३ खासदार आहेत तर शिवसेनेचे १८ व एकुण एनडीएचे ३५० पेक्षा जास्त खासदार आहेत. मंदिर उभारणीसाठी यापेक्षा आणखी काय जास्त हव आहे ? आता जर राम मंदिर बांधल नाही तर, आपण देशवासियांचा विश्वास गमावून बसू असेही राऊत म्हणाले.

भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने सुरूवातीपासूनच राम मंदिराचा मुद्दा उचलुन धरलेला आहे, एवढेच नाहीतर लोकसभा निवडणुकी अगोदर शिवसेनेने भाजपा सरकारवर मंदिर उभारणीच्या मुद्यावरून अनेक आरोपही केले आहेत. आता दोन्ही पक्ष सत्तेत असल्याने शिवसेनेने पुन्हा एकदा मंदिराचा मुद्दा बाहेर काढला असल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळाल्यानंतर आता तरी भाजपा सरकारकडून अयोध्येतील राम मंदिराची लवकरात लवकर उभारणी होईल, अशी सातत्याने राम मंदिर उभारणीची मागणी करणा-यांना अपेक्षा आहे. शिवाय भाजपा कडून देखील निवडणुकी अगोदर आम्ही मंदिर उभारणीसाठी सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता केंद्रात पुन्हा एकदा एनडीए आघाडीचे सरकार आल्याने यंदा तरी मंदिर प्रश्न निकाली निघेल असे सर्वांना वाटत आहे.