घरातील तेरा वर्षांच्या अल्पवयीन मोलकरणीशी अश्लील वर्तन करून नंतर तिच्यावर घरमालक आणि नोकराने आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मोलकरणीला दमदाटी करणाऱ्या सून रूपा आणि प्रीती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.  कल्याणमधील शिवाजी चौकात जसवंत कारिया (वय ७०), त्यांचा नोकर नीलेश मुळे (वय १८), सून रूपा, प्रीती हे एकत्र राहतात. घरात काम करण्यासाठी कारिया कुटुंबीयांनी मध्य प्रदेशमधून एका मुलीला आणले आहे. जसवंत हे या मुलीशी नेहमी अश्लील वर्तन करीत. याबाबत ही मुलगी सून रूपा यांना सांगत असे. पण तिच्याकडून जसवंत यांना आडकाठी करण्यात येत नव्हती.  गेले डिसेंबरमध्ये जसवंत व नोकर नीलेशने संगनमत करून मोलकरीण झोपली असलेल्या  खोलीत प्रवेश केला व तिच्यावर बलात्कार केला. याविषयी या मुलीने रूपाला सांगूनही तिने मुलीला गप्प राहण्यास सांगितले. घरातील त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने अखेर रविवारी या चौघांविरुद्ध मुलीने तक्रार केली. पोलीस निरीक्षक एम. एस. नेर्लेकर तपास करीत आहेत.
दोन तरुणींचा विनयभंग
कल्याण पूर्वेतील सूचकनाका भागात रविवारी संध्याकाळी दोन तरुणांनी रस्त्याने जात असलेल्या दोन तरुणींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.  संदीप जाधव, नंदीप तांबोळी अशी आरोपींची नावे आहेत. गणेशनगर, होमबाबा टेकडी येथे राहणारे संतोष व नंदीप हे सूचकनाका येथून जात होते. त्याच वेळी सतरा व चौदा वर्षांच्या दोन मैत्रिणी शिवण क्लासचे वर्ग पूर्ण करून घरी जात होत्या. संतोषने एका मैत्रिणीच्या हातात स्वत:चा मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी दिली. तिने ती स्वीकारण्यास नकार दिला. या तरुणाने तिची बदनामी करण्याची धमकी दिली. नंदीपने दुसऱ्या मुलीचा हात हातात घेऊन माझ्याशी मैत्री कर, नाही तर बघून घेईन, अशी धमकी दिली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बालिकेचा विनयभंग
डोंबिवलीतील पोस्ट अॅन्ड टेलिग्राफ वसाहतीततील एका ७८ वर्षांच्या वृद्धाने एका चार वर्षांच्या बालिकेचा विनयभंग केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. आत्माराम चोपडेकर (वय ७८) असे या वृद्धाचे नाव आहे. ते सेवानिवृत्त आहेत.  शनिवारी संध्याकाळी चोपडेकर यांनी सोसायटी कार्यालयात बालिकेला नेऊन तिचा विनयभंग केला.