दिवसभराच्या कामाच्या ताणासोबतच लोकल पकडण्यासाठी करावी लागणारी धावपळ, गर्दी आणि गोंगाट यामुळे हैराण झालेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास लवकरच निसर्गचित्रांनी नटलेल्या प्रसन्न डब्यांतून होणार आहे. हिरवी झाडे, गवत, फुलपाखरे आदी निसर्ग चित्रे रेखाटलेले विशेष डबे मध्य रेल्वेवर धावणार असून पहिल्या टप्प्यामध्ये दोन डबे महिला प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

रेल्वेच्या डब्यांमध्ये रंगसंगतीबाबत काही नियम ठरलेले आहेत. मात्र या नियमांना बाजूला सारत प्रवाशांचा विचार करून  रंगसंगती वापरून लोकलच्या डब्यांचे रुपडे बदलण्यात आले आहे. माटुंगा येथील कार्यशाळेमध्ये हा नवीन प्रयोग साकारला आहे. कार्यशाळेतील अमोल धाबडे, चंदू अगुरु या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या कल्पकतेतून डब्यांमध्ये गुलाबी, हिरव्या रंगसंगतीचा वापर करून विविध आकाराची फुले, फुलपाखरे, गवत आदी आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत.

प्रवासातील ताण विसरून नवा उत्साह येण्यासाठी हे रंग पूरक असल्याने हा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दोन डबे रंगविण्यात आले असून लवकरच महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात येतील. पुढील टप्प्यांमध्ये अजून काही डब्यांची निर्मिती करण्यात येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गाडय़ांच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे नाराज झालेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास प्रसन्न करण्यासाठी हा वेगळा प्रयोग केला जात असला तरी प्रवाशांकडून कशारितीने प्रतिसाद मिळेल, याची चर्चा रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये असल्याचे समजते.