सीमेवरील तणाव, राजकीय विरोध आणि जनक्षोभाच्या भीतीने सहभाग अनिश्चित

भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाचे परिणाम दोन्ही देशांतील कला, व्यापार आणि साहित्य-सांस्कृतिक देवाणघेवाणीवर होत असताना याचे लोण आता शिक्षणजगतापर्यंत पोहोचले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात होत असलेल्या मुंबई येथील आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये यंदा प्रथमच सहभागी होणार असलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा सहभाग आता अनिश्चित बनला आहे. सीमेवरील तणावाचे उमटत असलेले राजकीय पडसाद आणि जनमानसातील तीव्र भावना या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानी विद्यार्थ्यांना बोलवायचे की नाही, असा प्रश्न आयोजकांना पडला आहे. मात्र, तरीही येत्या काही दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन याबद्दल अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत काम करू न देण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभ्या केलेल्या वादाची झळ आता देशभरातील पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमांना बसू लागली आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम आयोजकांना रद्द करावे लागले, तर पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या चित्रपटांवर बंदी टाका, इतपत हा विखारी विरोध व्यक्त होऊ लागला आहे. त्यात यंदा कधी नव्हे ते टेकफेस्टमध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे या वादाच्या झळा टेकफेस्टला बसू नये म्हणून आयोजकांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या सहभागावरून उपस्थित होणाऱ्या वादाबाबत संस्थेच्या संचालक आदी वरिष्ठांशी नुकतीच चर्चा केली. परिस्थितीचा आढावा घेऊन यावर निर्णय घेतला जाईल, असे या बैठकीत ठरल्याचे समजते. टेकफेस्ट डिसेंबरमध्ये आहे. तोपर्यंत परिस्थिती थोडीफार निवळली तर प्रश्नच नाही; परंतु तणाव कायम राहिला तर पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचे की नाही, याचा विचार करावा लागले, असे टेकफेस्टच्या आयोजक विद्यार्थ्यांपैकी एकाने सांगितले.

टेकफेस्टच्या प्रसिद्ध रोबोवॉरमध्ये सहभागी होण्याकरिता हे विद्यार्थी येणार आहेत. कराचीतील ‘एनडीई युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स’मधील तीन विद्यार्थी आपला रोबो घेऊन या स्पर्धेत आपले तंत्रज्ञानातील कौशल्य दाखविणार आहेत. आशियातील सर्वात मोठा तंत्र महोत्सव अशी ख्याती असलेल्या टेकफेस्टमध्ये जगभरातून विद्यार्थी सहभागी होत असतात. गेल्या वर्षी प्रथमच टेकफेस्टच्या निमित्ताने पाकिस्तानी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. मात्र, डिसेंबरमध्ये होणाऱ्या या महोत्सवाकरिता नोव्हेंबरमध्ये निमंत्रण देण्यात आले होते. त्यामुळे व्हिसा, तिकिटे आदी प्रक्रिया पूर्ण करण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने विद्यार्थी सहभागी होऊ शकले नाहीत; परंतु यंदा सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. काही प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. आता प्रश्न त्यांच्याकडून व्हिसा, तिकिटे आदी प्रक्रिया मार्गी लागण्याचा आहे. १६ ते १८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या महोत्सवाला हजेरी लावण्याकरिता त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. त्यामुळे, किमान या आघाडीवर तरी काहीच अडचण नाही, असे आयोजकांपैकी एक असलेल्या करण मेहता या विद्यार्थ्यांने सांगितले.

या महोत्सवात विज्ञान, तंत्रज्ञानविषयक कल्पनांची देवाणघेवाण होणार आहे. त्यामुळे, यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ते केवळ पाकिस्तानातून आहेत म्हणून विरोध करणे चुकीचे आहे.

– एक आयआयटी विद्यार्थी

पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या आगमनाला कुणी विरोध केलाही तरी त्यांच्या सुरक्षिततेची आयआयटीत पूर्णपणे काळजी घेतली जाईल. टेकफेस्टदरम्यान परदेशी विद्यार्थ्यांची पवईच्या कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहात राहण्याची सोय केली जाते. तसेच, पवईच्या आयआयटीत बाहेरील वाहनांना मज्जाव आहे. परवानगीशिवाय कुणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे, हे विद्यार्थी कॅम्पसवर सुरक्षितच राहतील.

– आयोजक, आयआयटी टेकफेस्ट