राफेल काराराची फाईल आपल्या बेडरुममध्ये असल्याचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे वाक्य म्हणजे पंतप्रधानांना दिलेली धमकी होती, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

चव्हाण म्हणाले, राफेल प्रकरणाची फाईल आपल्याकडे असल्याचा पर्रिकरांनी आपल्या मंत्रीमंडळासमोर केलेला दावा हा पंतप्रधानांवर केलेला गंभीर आरोप आहे. कारण, गोव्यातील सत्तेतून पर्रिकरांना हटवण्यात येऊ नये यासाठी त्यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर दबाव टाकण्यात आला त्यांना ब्लॅकमेल केले जात आहे. जर राफेल प्रकरणाची मूळ फाईल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे असल्याचे सरकार सांगत आहे. तर या फाईलमधील एक एक कागद समोर कसा येत आहे, असा सवाल करताना ही फाईल शंभर टक्के पर्रिकरांकडेच असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. याबाबत काही लोकांशी आपलं बोलण झालं असून त्यांनीच ही माहिती आपल्याला दिल्याचे चव्हाण म्हणाले.

राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने प्रामाणिकपणे चौकशी केल्यास किंवा संयुक्त संसदीय समितीसमोर याची चौकशी झाल्यास सत्य नक्कीच समोर येईल. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी प्रामाणिक नाही कारण राफेलप्रकरणी ज्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या मूळ प्रश्नावर कोर्टाने उत्तरच दिलेले नाही. किंमतीबाबतच घोटाळा झालेला असताना सुप्रीम कोर्ट म्हणते की किंमतीबाबत आम्ही निर्णय देणार नाही. मात्र, असं कसं होऊ शकेल?, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

पाकसोबत क्रिकेट खेळण्याबाबत गावसकर आणि तेंडूलकरांच्या मतांचा आदर

पुलवामा हल्ल्यानतंर मोदी सरकारने पाकिस्तानला शस्त्रांद्वारेच उत्तर द्यावे, मात्र सरकारची ही क्षमता नाही त्यामुळे पाकिस्तानचे पाणी तोडू, आर्थिक बंधने घालू आणि क्रिकेट खेळू नये असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबत सुनिल गावसकर आणि सचिन तेंडूलकर यांच्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.