माजी भाजप आमदार पाशा पटेल यांनी ‘मनोरा’ आमदार निवासात अनधिकृतपणे मुक्काम ठोकल्याने त्यांचे सामान मंगळवारी शासकीय कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असताना माजी आमदारावर कारवाई करण्याची पाळी आली आहे.

या आमदार निवासातील खोली पंकजा मुंडे यांच्यासाठी देण्यात आली होती. त्या मंत्री झाल्यावर त्यांना बंगला देण्यात आला. त्यानंतर त्यांनी या जागेचा ताबा सोडल्याचे पत्र दिले. पण ती खोली पाशा पटेल यांच्याकडेच होती. दोन महिन्यांपूर्वी ही जागा साकोलीचे आमदार राजेश काशीवार यांना मंजूर करण्यात आली होती. पण त्या खोलीत पाशा पटेल यांनी मुक्काम ठोकला होता. अनेकदा सांगूनही त्यांनी खोली रिकामी न केल्याने काशीवार यांनी शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्ण्यात आली. अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधूनही पाशा पटेल यांनी तो उचलला नाही.