उपनगरी गाडीतील गर्दीमुळे एक महिला आणि तिची दोन मुले खाली पडून गंभीर जखमी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी (८.५५) हार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानकात घडला. तिघाही जखमींना कामोठे आणि बेलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिघांच्याही डोक्याला मार लागला आहे.पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोली येथे कपडय़ांना इस्त्री करण्याचे काम करणाऱ्या कनोजिया  मुन्नी पप्पू कनोजिया (२२) आणि तिची दोन मुले श्वेता (७) व अनुराग (९) हे मुंबईच्या कस्तुरबा इस्पितळात जाण्यासाठी रेल्वे स्थानकात आले. मानसरोवर स्थानकावर गाडीतील गर्दीमुळे त्यांना डब्यात पूर्णपणे आत जाता आले नाही. गाडी सुटल्यावर गर्दीच्या रेटय़ामुळे प्रथम श्वेता आणि अनुराग खाली पडले आणि नंतर मुन्नी खाली पडली. हे तिघेही गाडी खाली न येता रूळांच्या बाजूला पडले. श्वेताच्या डोक्याला जखम झाली असून तिच्या उजव्या मांडीचे हाड मोडले आहे तर अनुरागच्या डोक्याला जखम झाली आहे. मुन्नीच्याही डोक्यालाच मार लागला असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वीही गर्दीमुळे खाली पडून अंधेरी येथे एक तरूण जखमी तर शीव येथील तिघांचा मृत्यू झाला होता.