मुंबई : पश्चिम रेल्वेवरील दादर – माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना बुधवारी सकाळी लोकलची धडक लागून एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे बुधवारी सकाळपासून पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली होती.
दादर – माटुंगा रोड रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडत होता. यावेळी धावत्या डाऊन लोकलसमोर प्रवासी आला आणि त्याला लोकलची जोरदार धडक लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सदर प्रवाशाच्या डोक्याला इजा झाली. रेल्वे पोलीस आणि रेल्वेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून जखमी व्यक्तीला मृत घोषित केले. संबंधित प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नसून पुढील तपास सुरू आहे, असे मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल काही काळ कूर्मगतीने धावत होती. परिणामी, प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.

हेही वाचा…गायक नंदेश उमपही निवडणुकीच्या मैदानात; ईशान्य मुंबईत बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी

रेल्वे रूळ ओलांडून सर्वाधिक मृत्यू

जानेवारी – डिसेंबर २०२३ या कालावधीत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे अपघातात २,५९० प्रवाशांचा मृत्यू झाला, तर २,४४१ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी सर्वाधिक मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाले. रुळ ओलांडताना १,२७७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये १,१६८ पुरुष आणि १०९ महिला प्रवाशांचा समावेश आहे. यापैकी मध्य रेल्वेवर रेल्वे रुळ ओलांडताना ७८२ आणि पश्चिम रेल्वेवर ४९५ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, या घटनेत एकूण २४१ प्रवासी जखमी झाले असून यात मध्य रेल्वेवरील १४८ आणि पश्चिम रेल्वेवरील ९३ प्रवाशांचा समावेश आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger killed in collision with local train between dadar matunga road railway station western railway services disrupted mumbai print news psg