ठाणे महापालिकेचा इशारा
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तीन शहरांना होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात लागू झाल्याने शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये आठवडय़ातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय वाटेल तसे पाणी वापरूनही बिले थकविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कडक मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून घरगुती तसेच व्यावसायिक थकबाकीदारांनी येत्या २० फेब्रुवारीपर्यंत बिलांचा भरणा करावा अन्यथा नळ जोडण्या खंडित केला जाईल, असा इशारा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.
ठाणे महापालिकेस वेगवेगळ्या शासकीय प्राधिकरणांकडून प्रतिदिनी सुमारे ५५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. शहरातील पाण्याची गरज ४५० दक्षलक्ष लिटर इतकी आहे.  दररोज १०० दक्षलक्ष लिटर इतका जादा पाणीपुरवठा होऊनही शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण होते. पाण्याचा होणाऱ्या अर्निबध वापरावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिकेने शहरात पाण्याचे मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवे मीटर खरेदी करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला असून ही प्रक्रिया पूर्ण होताच मीटर जोडण्याची कामे सुरू करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे पाण्याचा वाटेल तसा वापर करूनही बिले थकविणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आता महापालिकेने कारवाईचा इशारा दिला आहे. पाण्याची बिले भरता यावीत यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही देयके स्वीकारण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे.