scorecardresearch

राणीच्या बागेतल्या पेंग्विन्सचं झालं बारसं; आता ‘या’ नावांनी ओळखले जाणार नवे पाहुणे

या निमित्ताने उद्यानाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नामकरण सोहळ्यानिमित्त केकही कापण्यात आला.

मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या पेग्विंनच्या पिल्लाचं आणि वाघाच्या बछड्याचं आज नामकरण करण्यात आलं. राणीच्या बागेतल्या या नव्या पाहुण्यांच्या नावांची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या निमित्ताने उद्यानाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून नामकरण सोहळ्यानिमित्त केकही कापण्यात आला.

यावेळी माध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नामकरणाविषयी माहिती दिली. या उद्यानात आलेल्या सगळ्या प्राणी-पक्ष्यांमुळे उद्यानातलं वातावरण आता सकारात्मक होत असल्याचंही पेडणेकर यांनी सांगितलं. पेंग्विनच्या नव्या पिल्लांविषयी सांगताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “उद्यान व प्राणीसंग्रहालयातल्या हम्बोल्ट प्रजातीच्या डोनाल्ड आणि डेझी या पेंग्विनच्या जोडीने १ मे २०२१ रोजी नर पिल्लाला जन्म दिला. त्याचं नाव ओरिओ असं ठेवण्यात आलं आहे. तर मोल्ड नावाचा नर आणि फ्लिपर नावाची मादी यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी नर पिल्लाला जन्म दिला आहे, त्याचं नाव ऑस्कर ठेवण्यात येत आहे”.

या नव्या पिल्लांमुळे आता उद्यानातल्या पेग्विंनची संख्या ९ वर पोहोचली आहे. यात पाच नर आणि चार मादी आहेत. राणीच्या बागेत २०१७ मध्ये पेंग्विन आणल्यापासून येणाऱ्या पर्यटकांची संख्या हजारोंनी वाढली असून दररोज पाच हजार पर्यटक इथं भेट देतात. तर सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजारांपर्यंत पर्यटक याठिकाणी भेट देतात. करोना प्रादुर्भावामुळे सध्या राणीची बाग बंद ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Penguin in veermata jijamata garden and zoo ranichi baug mumbai vsk

ताज्या बातम्या