आझाद मैदान येथे गेल्या ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराबाबत महिला वाहतूक पोलीस निरीक्षकाने केलेल्या कवितेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी जनहित याचिका करण्यात आली. ही कविता जातीय तेढ निर्माण करणारी असून कायदा-सुव्यवस्थेची घडी नीट ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतीलच एकीने ती लिहिली असून सामाजिक बांधिलकी धोक्यात आणली जात आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.
‘मुस्लिम-ए-हिंद’ या संस्थेचे अमीन मुस्तफा इद्रिसी यांच्यासह हिंसाचारातील एक आरोपी नजर मोहम्मद अशा दोघांनी ही याचिका केली आहे. मोहम्मद हा सध्या जामिनावर बाहेर आहे. दोन समुदायांत तेढ निर्माण करणाऱ्या या कवितेप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, सहआयुक्त (प्रशासन) हेमंत नागराळे, ही कविता लिहिणाऱ्या सुजाता पाटील या महिला पोलीस निरीक्षक आणि त्यांची कविता प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकाचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या कवितेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पोलीस दलाने विनाशर्त माफी मागण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्याप ही माफी मागण्यात आली नसल्याने आपण न्यायालयात धाव घेतल्याचा याचिकादारांचा दावा आहे.
या प्रकरणी याचिकादारांनी आधीच तक्रारही नोंदवली आहे. मात्र त्यावरही काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचा त्यांचा दावा आहे. ही कविता पोलीस दलातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ‘संवाद’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. या कवितेमुळे सर्वत्र वादाचे मोहोळ उठले आहे.