मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा शुक्रवारी मुंबईत होत असून त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत जागावाटपात भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा अशारितीने युती झाली. विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत मोठा भाऊ असणारी शिवसेना आता धाकटय़ा भावाच्या भूमिकेत आली. महायुतीला २२० जागा मिळवण्याचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. त्यामुळेच निवडणूक प्रचार काळात एकत्र न फिरता स्वतंत्रपणे फिरून जास्तीत जास्त मतदारसंघात पोहोचण्याची रणनीती ठरवण्यात आली. केवळ युतीचेच नाही तर भाजपचे नेतेही वेगवेगळे फिरून अधिकाधिक मतदारसंघात पोहोचत आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावमधील पहिली सभा सोडली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी यांच्या सभेत दिसत नाहीत. त्यावेळेत ते इतर दोन मतदारसंघात सभा घेतात. शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधी शिरस्त्याप्रमाणे भाजप-शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईत सभा होते. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शुक्रवारी सायंकाळी होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित राहतील. महायुतीचे अनेक बंडखोर एकमेकांविरोधात उभे आहेत. या पाश्र्वभूमीवर युतीच्या सर्वोच्च नेत्यांच्या या पहिल्या व शेवटच्या संयुक्त प्रचार सभेत काय संदेश देतात याबाबत उत्सुकता आहे