कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची मालमत्ता लिलावात खरेदी करू नये, यासाठी एका माजी पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या छोटा शकीलच्या गुंडाला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.
या धमकीला न घाबरता या माजी पत्रकाराने रौनक अफरोझ हे दाऊदच्या मालकीचे हॉटेल चार कोटी २७ लाख रुपयांचा खरेदी केले आहे.
या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स यांनी तांत्रिक माहितीद्वारे दाऊदचा कट्टर हस्तक छोटा शकील हा मुंब्रा परिसरातील सय्यद अब्बास टुबलानी (४७) या इसमाच्या संपर्कात असल्याचे शोधून काढले.
त्यानुसार संबंधित इसमाची खबऱ्यामार्फत माहिती मिळवून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या वेळी आपण सदर पत्रकारावर हल्ल्याची तयारी असल्याची सय्यदने कबुली दिली. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. विनायक मेर, सचिन कदम, संजीव धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सय्यद हा दाऊद टोळीचा जवळचा हस्तक असून त्याच्याविरुद्ध आग्रीपाडा, डोंगरी, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुंड साधू शेट्टीवर गोळीबार करण्यातही त्याचा हात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
त्याचे अन्य साथीदार पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. १९९९ मध्ये तो दुबईत पसार झाला आणि दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याच्यासाठी तो चालकाचे काम करू लागला.
छोटा शकीलच्या सांगण्यावरून दुबईत मटका चालविणाऱ्या मनीष अजमेरी याच्यावर हल्ला केला होता. दुबईमध्ये काही गुन्ह्य़ात त्याला अटकही झाली होती. २००८ मध्ये मुंबईत आला आणि हैदराबाद पोलिसांनी एका गुन्ह्य़ात त्याला अटक केली होती.
त्यात जामिनावर सुटल्यानंतरही तो छोटा शकीलच्या संपर्कात होता, असे त्याच्या चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.