आग प्रतिबंधक उपाययोजनेचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या शहरातील बारचे परवाने रद्द करण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेने बेकायदा बांधकामे करणाऱ्या लेडीज बार विरोधात कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी बारचे परवाने रद्द करण्याचा धडका लावला आहे.
ठाणे शहरातील बारमध्ये छुप्या खोल्या तयार करण्यात येत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले होते.  त्यामुळे ठाण्याचे सह पोलिस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी अशा बारच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली होती. त्यानुसार, महापालिकेच्या विशेष पथकाने बेकायदा बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनीही अग्निसुरक्षा कायद्याचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या बार मालकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. राबोडी येथील हनीकॉम, मानपाडय़ातील के. नाईट, साईकिरण, चेतन (श्रद्धा), माजिवाडा येथील पवित्रा, माया, कापुरबावडीतील मनजित, नक्षत्र, मधुबन या बारचे परवाने रद्द केले आहेत. यापैकी हनीकॉम, माया, मधुबन अशा काही बडय़ा बारवर वर्षांनुवर्षे देखाव्यापुरती कारवाई होत असे. परंतु या वेळी भक्कम कारवाई असेल, असे सूत्रांनी सांगितले.
१२ बेकायदा बांधकामे जमीनदोस्त
ठाणे पोलिसांच्या विनंतीनुसार महापालिकेने आतापर्यंत १२ लेडीज बारची बेकायदा बांधकामे जमिनदोस्त केली आहेत. यामध्ये उपवन, कापुरबावडी, मानपाडा, नागला बंदर याठिकाणी उभ्या राहीलेल्या बारचा समावेश आहे.