लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राज्यात १७ हजार पोलिस शिपायांची भरती करण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी केली होती. परंतु भरती जाहीर होत नसल्याने पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांची धाकधुक वाढली होती. अखेर सरकारने भरती जाहीर केली आहे. राज्यभरात पोलिस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया मंगळवारपासून (ता. ५) सुरू होत आहे.

त्यासाठी policerecruitment2024.mahait.org आणि http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भरतीसंदर्भातील माहिती देण्यात आली असून तेथे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आवेदन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली आहे.

आणखी वाचा-समृद्धी महामार्गावरील खड्ड्यांची तांत्रिक चौकशी, तीन-चार दिवसात खड्डा बुजवला जाणार

पोलीस शिपाई , पोलीस शिपाई चालक आणि कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये शुल्क भरावे लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ३५० रुपये शुल्क भरावे लागेल.

या भरती प्रक्रियेमध्ये प्रथम उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून प्रवर्गामधील रिक्त पदाच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळालेले उमेदवार अपात्र ठरतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police recruitment process starts from tomorrow mumbai print news mrj