रविवारी जोगेश्वरी येथून अपहरण करण्यात आलेल्या एक वर्षांच्या मुलाची एमआयडीसी पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेच्या बहिणीनेच हे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. भावाला मूल होत नव्हते म्हणून हे अपहरण केल्याचे तिने सांगितले
 जोगेश्वरीच्या सारीपाट नगर येथे राहणारी अनिता ही महिला शेजारील महिलांसोबत आरे कॉलनी येथे सहलीसाठी गेली होती. तिच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेची बहिण रजनी चव्हाण (३८) ही सुद्धा या सहलीसाठी आली होती. मात्र घरी परताना मोहिते यांचा १ वर्षांचा मुलगा सत्यम बेपत्ता झाला होता. याप्रकरणी तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिसांनी त्वरीत तपास करून संशयावरून रजनीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने  गुन्ह्य़ाची कबूली दिली. आपला भाऊ श्रीधर मोहिते (४५) याच्या लग्नाला दहा वर्षे होऊनही मूल झाले नव्हते. त्यामुळे रजनीचे सत्यमच्या अपहरणाचा डाव रचला आणि अपहरण करून  डोंबिवलीत भावाकडे ठेवल्याची कबूली तिने दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश हुजबंड यांनी सांगितले.