लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सांताक्रुझ येथे पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. प्रल्हाद मधुकर बनसोडे (४२) असे या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांनी आपल्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

वाकोला येथील नवीन पोलीस अधिकारी वसाहतीमध्ये ही घटना घडली. याच वसाहतीतील इमारत क्रमांक ७५ मधील खोली क्रमांक ४०६ मध्ये प्रल्हाद बनसोडे कुटुंबियांसोबत राहत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले प्रल्हाद बनसोडे मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यात ते मंगळवारी सायंकाळी इमारतीच्या गच्चीवर गेले होते. काही वेळानंतर त्यांनी तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच वाकोला पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांना प्रल्हाद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना तातडीने जवळच्या व्ही. एन देसाई रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आणखी वाचा-मुंबई : तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठीचे वावडे

त्यांची नेमणूक बॉम्बशोधक व नाशक पथक, कलिना येथे होती. नुकतीच त्यांची बढतीवर बदली झाली होती. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नसल्यामुळे आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही. कुटुंबियांचे जबाब नोंदवले असून त्यात ते तणावाखाली असल्याचे सांगण्यात आले आहे. पण त्यांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policeman commit suicide in vakola mumbai print news mrj