लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णतः वातानुकूलित एक्स्प्रेस अशी ओळख असलेली तेजस एक्स्प्रेस आता असुविधांची एक्स्प्रेस बनू लागली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या चालढकलपणामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाचनप्रेमींसाठी तेजस एक्स्प्रेसमध्ये केवळ इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध करून देण्यात येत असून मागणी केल्यानंतरही मराठी वृत्तपत्रच उपलब्ध होत नसल्याची खंत अनेक प्रवासी व्यक्त करू लागले आहेत.

मुंबई – गोवा प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी प्रवासी गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेसला पसंती देतात. जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना निकृष्ट दर्जाचे जेवण देणे, बुरशीयुक्त ब्रेड दिल्याची घटना यापूर्वी घडली आहे. तसेच तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवट बंद होणे, मनोरंजन स्क्रीन, वायफाय आणि यूएसबी सॉकेट आदी सुविधा बंद असणे. आदी विविध समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागते. तेजस एक्स्प्रेसमधून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत आहेत. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.

आणखी वाचा-महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी

मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्‍या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले.