लोकसभा निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येत आहे, तसे ठाण्यातील राजकीय नेत्यांशी संबंधित असलेले गुंडपुंड पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागले आहेत. सोमवारी पहाटे वागळे इस्टेट परिसरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तब्बल ११ दुचाकी जाळण्यात आल्या, तर हाजुरी येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावाने सुरू असलेल्या व्यायामशाळेला आग लावण्यात आली. या प्रकरणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांशी सलगी साधून असलेल्या वागळेतील काही गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आम्हाला बदनाम करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हे कुभांड रचल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला असून सांस्कृतिक ठाण्यात पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरू झालेल्या या गुंडगिरीमुळे स्थानिक रहिवासी मात्र धास्तावले आहेत.
महिनाभरापूर्वी कोपरी परिसरात झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसप्रणीत गुंडांच्या दादागिरीचा अनुभव कोपरीकरांनी घेतला होता. सोमवारी पहाटे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मोटारसायकलींची होळी होताच पोलिसांनी शिवसैनिक असलेला पापा सुर्वे या गुंडाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. पापाला ताब्यात घेताच खवळलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी त्याच्या सुटकेसाठी शिवसैनिकांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे गुंडांना राजाश्रय देण्यात ठाण्यातील शिवसेनाही मागे नसल्याचे दिसून आले. जाळण्यात आलेल्या सर्व दुचाकी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी वागळे तसेच श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेच्या पुरस्कृत गुंडापुंडांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार वागळे इस्टेट पोलिसांनी हाजुरीत राहणाऱ्या अमीर गुलबाज खान आणि अशरफ मुस्तफा शेख या दोघांना संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर कोपरीतील सिद्धू आणि बहाद्दूर या दोघा संशयितांचा शोध सुरू केला आहे. कोपरी निवडणुकीत काँग्रेसच्या गुंडांची रेलचेल सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखाली वावरणारा सिद्धू शिवसेनेसाठी सक्रिय होता. त्याचे नाव सोमवारच्या जळीतकांडात पुढे आल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
किसननगर परिसरात एक दुचाकी जाळण्यात आल्याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात रहाणारा पापा सुर्वे या गुंडाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पापा सुर्वे शिवसैनिक असल्याने त्याच्या सुटकेसाठी आमदार शिंदे यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी शिवसैनिक मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्याच्या आवारात जमले होते. दरम्यान, तक्रारदाराने सुर्वे यांचे नाव घेतलेले नसतानाही काँग्रेसकडून त्यांचे नाव देण्यात आले असून त्याला या प्रकरणात गोवण्यात येत आहे. तसेच काँग्रेसच्या दबावामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करत असल्याचा दावा एका शिवसेना नेत्याने केला.