मुंबईतील गणेशोत्सवासह सार्वजनिक उत्सवांवरील गंडांतर दूर करण्यासाठी कुरघोडीचे राजकारण सुरू झाले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी ‘वर्षां’ निवासस्थानी भेट घेतली. चर्चेचा तपशील न सांगता ‘गणेशोत्सवातील सर्व विघ्ने दूर होतील,’ असे ठाकरे यांनी या भेटीनंतर सांगितले. दरम्यान, उत्सवांवर र्निबध आल्यास मंडळांमध्ये आणि जनतेमध्ये सरकारविरोधात रोष निर्माण होईल. त्यामुळे न्यायालयाने रस्त्यांवर उत्सवांना परवानगी न दिल्यास मुंबई महापालिका कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी पावले टाकण्याची तयारी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्री आदी सार्वजनिक उत्सवांवर र्निबध येणार असून, त्यामुळे सार्वजनिक मंडळांमध्ये घबराट आणि चिंतेचे वातावरण आहे. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावरून परत येताच मंगळवारी त्यांची भेट घेतली. मंडळांच्या बाजूने राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्याची तयारी दाखविली असून गरज भासल्यास कायद्यातही दुरुस्ती करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मात्र आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता भाजपने सार्वजनिक मंडळांची बाजू घेतली, असे चित्र निर्माण होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे यांनीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. ‘वर्षांनुवर्षे साजऱ्या होत असलेल्या उत्सवांवर गंडांतर नको,’ अशी भूमिका घेत ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याप्रश्नी कायदेशीर तोडगा कसा काढता येईल, याविषयी मुख्यमंत्र्यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.