महामार्गावरील उड्डाणपुलांवर खड्डय़ांचे साम्राज्य; टोलवसुली बंद झाल्याने देखभाल होत नसल्याचा कंपनीचा दावा
मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातून पुणे, कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या शीव-पनवेल महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या मानखुर्द ते पनवेल या २३ किमी अंतराच्या मार्गावरील जवळपास सर्वच उड्डाणपुलांची खड्डय़ांमुळे दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे, या महामार्गावरील हलक्या वाहनांची टोलवसुली बंद झाल्याने खड्डे बुजवणे शक्य नसल्याचे सांगत रस्ता बांधकाम कंपनीने हात वर केले आहेत. शिरवणे येथील उड्डाणपूलावर सोमवारी खडी टाकून हे खड्डे बुजवण्याचा केविळवाना प्रयत्न करण्यात आला होता पण ही खडी काही तासात पूलावर इतरत्र पसरल्याचे चित्र दिसून आले.
महामार्गावरील सानपाडा, शिरवणे, तुर्भे, नेरुळ आणि सीबीडी येथील उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला असून याठिकाणी छोटे-मोठे अपघातही वाढू लागले आहेत. पुलावरील दोन तुळई जोडण्यासाठी वापरलेल्या लोखंडांजवळच हे खड्डे पडल्याने वाहनांच्या चाकांना धोका निर्माण झाला आहे. खड्डयांबरोबच रस्त्याच्या उंचसखल भागात काही ठिकाणी पाणी तुंबले आहे. वाहतुकीला शीव-पनवेल मार्गावर होणारा खोळंबा सोडविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने चार वर्षांपूर्वी १२०० कोटी रुपये खर्च करून शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रिटीकरण केले आहे. खर्च वसुलीसाठी बांधा, वापरा हस्तांतरण करा तत्त्वावर उभारलेल्या या मार्गावर ‘शीव-पनवेल टोलवेज कंपनी’ने कळंबोली येथे टोलनाका उभारला आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी राज्यातील ५३ टोलनाके बंद करताना येथे हलक्या वाहनांना टोलमाफी दिली आहे. जड वाहनांच्या टोलमधून कोटय़वधीच्या वसुली होत आहे. मात्र, खड्डे बुजवण्याच्या बाबत मात्र कंपनीने पैसे नसल्याचे सांगत हात वर केले आहेत.